नगर तालुक्यातील 'या' गावात जुन्या वादातून झाला तुफान राडा


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील साकत या गावाच्या शिवारात असलेल्या मुंगसे वस्ती येथे जुन्या वादातून ७ जणांच्या टोळक्याने दोघा सख्या भावांना कुऱ्हाड, लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी (दि.२६) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले अनिल राजू मुंगसे यांच्यावर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत दीपक राजू मुंगसे (वय २०, रा.मुंगसे वस्ती, साकत) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रवीण शंकर पवार, अक्षय शंकर पवार, शंकर मुरलीधर पवार, बंडू बाबुराव निमसे, गणेश बंडू निमसे, अभिषेक अर्जुन निमसे, सागर अशोक मुंगसे (सर्व रा. साकत, ता.नगर) या ७ जणांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  

फिर्यादी दीपक मुंगसे हे मंगळवारी (दि.२६) सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांचे शेतामध्ये कांद्याच्या रोपास पाणी भरत असतांना यातील आरोपी यांनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या, गज, लोखंडी रॉड, कुऱ्हाड घेऊन फिर्यादीचा भाऊ अनिल मुंगसे याचे पाठीमागे पळत येऊन त्यांपैकी प्रवीण पवार याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने अनिल याचे डोक्यात पाठीमागे मारले. अक्षय पवार याने त्याचे हातातील कुऱ्हाडीने अनिलच्या डोक्यात मारत असतांना तो वार त्याने अडविला व शंकर पवार याने अनिलच्या पाठीत दगडाने मारले.

अभिषेक निमसे याने अनिल यास लाकडी दांड्याने पाठीत व पायावर मारले. सागर मुंगसे याने फिर्यादीचा भाऊ अनिल यास कवळ घातली गणेश निमसे याने अनिल व दीपक याच्या पाठीत लोखंडी गजाने मारहाण केली, बंडू निमसे याने अभिषेक निमसे यास काठी देऊन फिर्यादीस व त्याचा भाऊ अनिल अशांना मारहाण करण्यास सांगितले. तेव्हा त्याने फिर्यादीचे पाठीत काठीने मारले. 

तसेच त्या सर्वानी फिर्यादीस व त्याचा भाऊ अनिल यास शिवीगाळ करून भाऊ अनिल हा खाली पडलेला असतांना देखील त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा भाऊ अनिल यास तु परत जर भेटला तर तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिसांनी या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. वांढेकर हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments