श्रीगोंदा (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील न्यू होटेल प्रशांतमध्ये वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोर तरुणींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या विरोधात पारपत्र नियम कलमासह परकीय नागरिक कायद्यानुसार श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात आल्याचे त्या तरुणींनी पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंप्री शिवारातील सोलापूर रोडवर एका हॉटेलमध्ये बांगलादेशी तरुणी वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर २० वर्षांच्या ४ तरुणी आढळल्या. यात मुरसनिला अख्तर सफिऊर सिकंदर (मूळ रा. पकोरिया, खासियल, नुरेल, उपजिल्हा खलिया, बांग्लादेश) ही तरुणी जुई जियारेल मंडल या नावाने, रोमाना अख्तर रुमी (मूळ रा. हिदिया, वॉर्ड नंबर ६, अभय नगर, जैसोर, बांग्लादेश) ही तरुणी मिता आकाश शिंदे या नावाने, सानिया रॉबीऊल इस्लाम खान (मूळ रा. बांग्लादेश) ही मिम मंडल नावाने तर सानिफा अबेद अली खान (मूळ रा. बांग्लादेश) ही सानिफा जाहिद मंडल या नावाने वास्तव्यास होती.
चौकशीत या चारही तरुणींना मूळच्या बांग्लादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बेरोजगारीला कंटाळून वैध कागदपत्राशिवाय अवैधरित्या भारतात आल्याचे या महिलांनी सांगितले. त्यांच्याकडे रेडमी, ओपो मोबाईल, एनएक्सजी आणि आयफोन, ह्युवाई कंपनीचे मोबाईल, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, युनियन बँक डेबिट कार्ड असे साहित्य सापडले.
दरम्यान, ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे, उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलिस हवालदार अनिल गोरे यांच्यासह श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, सफौ भगवान गांगर्डे, पोलिस कॉन्स्टेबल प्रमिला उबाळे, योगेश भापकर आदींनी केली. भारतात येण्यासाठी लागणारा अधिकृत पासपोर्ट व व्हिसा आहे, अशी विचारणा पोलिस व पंचांनी केली. तेव्हा कोणतेही कागदपत्रे नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावरून वरील चारही तरुणी ह्या घुसखोर बांग्लादेशी असल्याने त्यांच्या विरोधात श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घुसखोरी करणाऱ्या तरुणी कशा पद्धतीने भारतात दाखल झाल्या. त्यांना आश्रय कुणी दिला, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डेबिट कसे मिळाले, हे पुढील तपासात निष्पन्न होणार असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले. कुणी आश्रय दिला याची माहिती घेणार
नातेवाईकांशी बोलण्यासाठी आयएमओ अॅपचा वापर
चारही तरुणींसोबत त्यांचे बांग्लादेशाकडील कागदपत्रे आहेत काय याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आमच्याकडे कुठलेही बांग्लादेशी कागदपत्र नसल्याचे सांगितले. बांग्लादेश येथील त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलण्यासाठी मोबाईलमधील आयएमओ अॅप वापरत होत्या. त्यात आमच्या बांग्लादेशातील नातेवाईंकाचे आयएमओ आयडी आहेत. त्यांच्या मोबाईलमधील कॉन्टेक्ट लिस्टमध्ये बांग्लादेश येथील कंन्ट्री कोड + ८८० चे मोबाईल क्रमांक मिळून आले.
Post a Comment