नगरसह राज्यभरात वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या 'तोतया आरटीओ' चा ‘पर्दाफाश’


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - आरटीओ कार्यालयाचा लोगो असलेले स्टीकर चिकटवलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत खाकी गणवेश घालून फिरत मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्या कडून दंडाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया आरटीओ अधिकारी व त्याच्या एका सहकाऱ्याचा भांडाफोड नगरच्या आरटीओ कार्यालयाच्या पथकाने केला असून त्यांच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नगरच्या आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सुनिल मधुकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक केवल जग्गी यांच्या मालकीचा मालट्रक (क्र. एम एच १६ ए ई १०४४) त्यांचा चालक अशोक नरहरी पांचाळ (रा. शिवाजी नगर, बीड) हा  ७ मे रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास नगर कडून बीड कडे घेवून जात असताना पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ त्याच्या मागून आरटीओ कार्यालयाचा लोगो असलेले स्टीकर चिकटवलेली पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी आली. त्यातील एक जण ट्रक चालकाला गाडी बाजूला घे असे म्हणाला. त्यानंतर त्या स्कॉर्पिओ मधून खाकी गणवेश घातलेले एक अधिकारी उतरले व त्यांनी ट्रकचालकाला तुझ्या गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र संपलेले आहे. तुला ६४ हजार दंड भरावा लागेल असे सांगितले.

त्यामुळे चालकाने ट्रक मालक जग्गी यांना फोन लावला, फोनवर जग्गी हे त्या अधिकाऱ्याशी बोलले असता त्याने तडजोडी अंती २५ हजार रुपये द्यावे लागतील व ते पैसे ५ मिनिटात अजय पानवाला याच्या फोन पे वर पाठवा असे सांगत एक नंबर दिला. जग्गी यांना त्या अधिकाऱ्याचा संशय आल्याने त्यांनी कॉन्फरन्स कॉल वर मोटार मालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क साधला. सानप त्या अधिकाऱ्याशी बोलले असता त्याने आपण वडाळा आरटीओ मधून सूर्यवंशी बोलतोय आणि सरकारी कामानिमित्त मुंबई हून बीड ला चाललो असल्याचे सांगितले. सदर कॉलची रेकॉर्डिंग  बाबा सानप यांनी नगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांना पाठवून या अधिकाऱ्याबाबत संशय व्यक्त केला.

आरटीओ सगरे यांनी लगेच मोटार वाहन निरीक्षक सुनिल पाटील यांना फोन करून सखोल चौकशी करण्यास सांगितले पाटील यांनी लगेच त्या ६४०४ नंबर असलेली स्कॉर्पिओ गाडी कोणत्या ठिकाणची आहे याची महाराष्ट्रभर चौकशी केली असता सदर गाडी ही ठाणे आरटीओ कार्यालयाची असल्याचे समोर आले. मात्र त्यांची गाडी त्यांच्या कार्यालयात असल्याचीही माहिती मिळाली. तसेच तेथे सूर्यवंशी नावाचे कोणीही अधिकारी नाहीत असे समजल्यावर ही माहिती पाटील यांनी आरटीओ सगरे यांना कळविली.

त्यानंतर आरटीओ सगरे यांच्या सूचनेनुसार त्यांनी पाथर्डी पोलिसांशी संपर्क केला. तो पर्यंत तो तोतया बीड कडे गेला होता. त्यानंतर बीड पोलिसांना ही माहिती देण्यात आली. बीड च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  त्या सूर्यवंशी नावाच्या तोतया आरटीओ अधिकाऱ्याला व त्याच्या एका साथीदाराला बनावट नंबर प्लेट लावलेल्या आणि आरटीओ कार्यालयाचा लोगो असलेले स्टीकर चिकटवलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी सह ताब्यात घेतले. या दोघांच्या विरुध्द मोटार वाहन निरीक्षक सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाथर्डी पोलिस ठाण्यात दोघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             

0/Post a Comment/Comments