अहिल्यानगर - जिल्ह्यात गाजत असलेल्या सिस्पे, ट्रेड्स, इन्फिनाईट बिकन कंपन्यांच्या बहुचर्चित गुंतवणूक
घोटाळ्याचा तपास वेगाने पुढे जात आहे. या घोटाळ्यातील एक महत्त्वाचा दुवा असलेल्या
सुमारे दीड हजार पेक्षा जास्त एजंटांची बँक खाती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
गोठवली (फ्रीज) आहेत. या खात्यांवर प्रचंड प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असल्याचे
तपासात स्पष्ट झाले असून यामुळे एजंटांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सुरूवातीला
महिन्याला 10 ते 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवून
गुंतवणूकदारांना या कंपन्यांनी जाळ्यात ओढले. सिस्पे, ट्रेड्स, इन्फिनाईट बिकन यांसह इतर नावांनी जिल्ह्यासह राज्यातील
विविध ठिकाणी विस्तृत नेटवर्क उभारण्यात आले. प्रमुख सूत्रधार नवनाथ औताडे आणि
अगस्त मिश्रा यांनी हजारो एजंटमार्फत कोट्यवधी रूपयांची उभारणी केली. आकर्षक
परतावा देत काही महिन्यांत विश्वास मिळवल्यानंतर अचानक कंपनीने व्यवहार बंद केले, कार्यालये रिकामी करण्यात आली आणि संचालक मंडळ पसार झाले. या प्रकरणात
श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले असून या
गुन्ह्याचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
तपासाचे नेतृत्व
पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे करत आहेत. त्यांनी तपासाला गती देत कंपन्यांच्या
निधीच्या ‘मनीट्रेल’चा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. विविध बँक खात्यांमधील
व्यवहार तपासताना अगस्त मिश्रा आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांमध्ये
मोठ्या रकमा आढळल्या. त्या अनुषंगाने संबंधित खात्यांवरील रकमेवर तातडीने कारवाई
करून सुरूवातीला ती गोठवण्यात आली आहे. आता या घोटाळ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे
कंपनीने तयार केलेले एजंटांचे जाळे असून मोठ्या कमिशनच्या आमिषाने अनेकांनी एजंट
म्हणून काम सुरू केले होते. मित्रपरिवार, नातेवाईक आणि समाजातील लोकांपर्यंत ही
योजना पोहोचवण्यात एजंटांचा मोठा वाटा होता.
अनेकांनी स्वतःही
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, तर काहींनी लोकांना चुकीची माहिती देत
फसवणूक केली आहे. सध्या अनेक एजंट पोलिसांच्या रडारवर असून काहींना अटक, तर काहींकडे चौकशी सुरू आहे. ज्या एजंटांनी जाणूनबुजून लोकांची फसवणूक केली
त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात येत आहे. एजंटांच्या बँक खात्यांवर शेकडो कोटी
रूपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील मोठी रक्कम कमिशन स्वरूपात जमा झाल्याचे
तपासात उघड झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दीड हजारांहून अधिक एजंटांची बँक खाती
गोठवली असून या खात्यांमध्ये किती रक्कम आहे याचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू
आहे. पोलिसांच्या मते, गोठवलेल्या खात्यांची संख्या आणखी
वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर त्रासलेल्या गुंतवणूकदारांमध्ये मात्र आता
काहीशी आशा निर्माण झाली आहे.
मोठ्या कमिशनचे धनी
नवनाथ औताडे व अगस्त मिश्रा यांच्या वतीने पैसे गोळा
करणारे हे एजंट मोठ्या कमिशनचे लाभार्थी ठरले होते. काहींनी या कमिशनमधून
स्वतःच्या गरजा भागवल्या, तर काहींनी पुन्हा कंपनीतच गुंतवणूक
केली. आता या एजंटांच्या खात्यांतील मोठ्या व्यवहारामुळे ते पोलिसांच्या तपासाच्या
चौकटीत आले असून, त्यांची संपूर्ण आर्थिक चौकशी सुरू आहे. गुंतवणूकदारांची
मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यानंतर सुरू झालेल्या या तपासामुळे दोषींवर कारवाईची
प्रक्रिया वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment