रील्स काढण्याच्या बहाण्याने ३१.७० लाखांची रोकड पळविणारा एक जण पकडला


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची तब्बल ३१ लाख ७० हजारांची रोकड घेवून पसार झालेल्या आरोपीच्या भावाला एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून त्याच्या कडून १६ लाख ५० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम घेवून पसार झालेल्या मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. सदर घटना २४ एप्रिल रोजी नगर मध्ये शेंडी बायपास रोडवर घडली होती.

याबाबत श्रेयश पांडुरंग लटपटे (वय २३, रा. भायगाव, ता.शेवगाव) या तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी श्रेयश याने तो काम करत असलेल्या फर्मचे २४ एप्रिल रोजी कारंजा मालेगाव, मेहकर येथील दुकानदारांकडून रोख रकमेचे कलेक्शन केले व ३१ लाख ७० हजारांची रोकड घेवून ते नगरला येत होते. त्यावेळी त्यांना त्यांचा मित्र सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) याचा फोन आला. फोन वर तो म्हणाला की तुझ्याकडे असलेल्या रोकड सोबत मला रील्स काढायचा आहे.

त्यामुळे सकाळी ९ च्या सुमारास दोघे एमआयडीसी येथील सनफार्मा चौकात भेटले. तेथून ते सुजित चौधर याच्या मारुती सियाझ कार (क्र. एमएच १६ बीएच ४७९९) मध्ये बसून शेंडी बायपास रोडवर गेले. तेथे गेल्यावर आरोपी चौधर हा फिर्यादी श्रेयश ला म्हणाला की, तू समोर उभ्या असलेल्या गाडीतून कॅमेरा  घेवून ये. त्यावेळी श्रेयश याने त्याच्या जवळील रोकड असलेली बॅग मारुती सियाझ कारच्या सीट वर ठेवून तो कॅमेरा आणण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच वेळी आरोपी चौधर याने कार सुरु करून तो भरधाव वेगात ३१ लाख ७० हजारांची रोकड असलेली बॅग घेवून पसार झाला होता. 

या गुन्ह्याचा तपास करत असताना स.पो.नि. माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यात आरोपी सुजित चौधर याचा भाऊ अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधर (वय २४, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) याचाही सहभाग आहे. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला पकडले. त्याच्या कडे लुटलेल्या रोकड पैकी १६ लाख ५० हजारांची रोकड मिळून आली, ती पोलिसांनी हस्तगत केली असून मुख्य आरोपी सुजित चौधर याचा पोलिस शोध घेत आहेत. 

0/Post a Comment/Comments