नगर शहरातील कॅफेंमध्ये चालतात भलतेच ‘कुटाणे’, पोलिसांची ५ ठिकाणी छापेमारी

 


अहिल्यानगर - कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणाऱ्या ५ कॅफेंवर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी २९ एप्रिल रोजी एकाच दिवशी छापेमारी करत ९ जणांच्या विरुध्द शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना नगर शहरातील कॅफेंची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी २९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, जालींदर माने, मयुर गायकवाड, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, ज्योती शिंदे यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे, सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे, सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील आँरिगेनो कॅफे, कोहिनूर मॉलजवळील झेडके कॅफे व स्टेट बँक चौक येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी छापेमारी केली. तेथे तरुण मुले, मुली अश्लील चाळे करताना आढळून आले.

पथकाने कॅफे चालक महेश पोपट खराडे (वय 23, रा.नालेगाव, (परफेक्ट कॅफे), आसिफ आयाज शेख (वय 26, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव रोड), विशाल विष्णु वाघ (वय 18, रा.बुरूडगाव रोड), मंगेश भरत आजबे (वय 19, रा.बुरूडगाव रोड), महेश शंकर दरंदले (रा.चिपाडेमळा) फरार, अविनाश विलास ताठे (वय 32, रा. ताठेनगर,  सावेडी), मंगेश  रमेश  देठे  (वय 19,  रा. भगवती  कोल्हार, ता.राहाता), महेश सातपुते (रा.अहिल्यानगर) फरार, कृष्णा अनिल कराळे (वय 19, रा.तपोवन रोड) यांचे विरूध्द कारवाई करुन कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) प्रमाणे 5 गुन्हे दाखल केले आहेत. पथकाने या कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments