दुचाकी व रिक्षास धडक देऊन कार झाली रस्त्यावर पलटी, अपघातात महिलेचा मृत्यू

 


अहिल्यानगर - भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस धडक देऊन पुढे रिक्षाला धडक दिली. आणि कार रस्त्यावरच पलटी झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पत्रकार चौकाकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा रोडवर ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अमन हमीद शेख, (वय ४३, रा. घासगल्ली कोठला, .नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पत्नी परवीन आणि मुलगी हयान सह होंडा कंपनीच्या अँक्टीवा मोपेडवर (क्र. एम एच १६ सी एक्स १६६२) घरी जात असताना पत्रकार चौकाकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा रोड क्रॉस करण्यासाठी थांबले असता समोरुन येणाऱ्या स्विप्ट डिझायर कार ( क्र. एम एच १७ सी आर २२६०) वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या मोपेडला समोरुन धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या दोन्ही हात व पायास दुखापत झाली.

तसेच फिर्यादीची पत्नी परवीन हिच्या डोक्यात गंभीर दुखापत होवुन रक्तस्त्राव झाला. व मुलगी हयान हिस किरकोळ दुखापत झाली. धडक दिल्यानंतर कार चालकाने तेथे न थांबता भरधाव वेगात निघून जाऊन पुढे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला (क्र. एम एच 16 सी ई 1265) देखील धडक देवून अपघात केला. व पुढे जाऊन ती कार पलटी झाली. अपघातातील जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान परवीन अमन शेख यांचा १ मे रोजी सकाळी मृत्यू झाला.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अमन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालका विरुद्ध भा. न्या. सं. १८१, १२५ () (३२४ (४५), सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments