अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसलाच मिळवून देण्यासाठी दीड लाख रुपये घेवून इच्छुक महिला उमेदवाराची फसवणूक प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक सौ मंगल भुजबळ यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळराजे उर्फ श्रीकृष्ण वसंतराव तौर पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सौ मंगल भुजबळ या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांना आरोपी बाळराजे यांनी फोन करून विधानसभा निवडणुकीत नगर शहराची जागा काँग्रेसला सुटणार असून तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गट पार्टीला फंड दयावा लागेल व त्यासाठी टोकन म्हणून तुम्हाला दीड लाख रुपये द्यावे लागतील. असे सांगून वेळ कमी आहे तुम्ही ताबडतोब मी दिलेल्या बँक खात्यावर दीड लाख पाठवा पैसे खात्यात जमा झाले तरच तुमच्या नावाची चर्चा मीटिंग मध्ये होईल, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे भुजबळ यांनी जागा काँग्रेसला मिळेल या आशेने आरोपी बाळ राजे यांच्यावर विश्वास ठेवला व आरोपी बाळराजे यांनी सांगितलेल्या राजे जाधव उदयसिंह सत्यजित यांचे नावावर दीड लाख रुपये गुगल पे वर पाठवले. परंतु पुढे फिर्यादी मंगल भुजबळ यांना अहिल्यानगर मतदारसंघासाठी उमेदवारी मिळून न देता त्या मतदारसंघात अभिषेक कळमकर यांना विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी देण्यात आली.
फिर्यादी मंगल भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली असे लक्षात आल्याने त्यांनी आरोपी बाळराजे यांना दिलेल्या दीड लाख रुपये रकमेची ५ नोव्हेंबर २०२४ रोजी मागणी केली असता आरोपीने ती रक्कम देण्याचे टाळले. आरोपीने फिर्यादी मंगल भुजबळ यांची फसवणूक, विश्वासघात केला म्हणून शेवटी भुजबळ यांनी आरोपी बाळराजे विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला १२ मार्च २०२५ रोजी लेखी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
या प्रकरणातील आरोपी बाळराजे याने अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी क्रिमिनल जामीन अर्ज ४२३/२५ चा जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन यांच्याकडे दाखल केला असता ३० एप्रिल रोजी न्यायालयाने उभय बाजूचा युक्तीवाद ऐकून घेऊन व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्जदार आरोपी बाळराजे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश एम एच शेख यांनी नाममंजुर केला असून आरोपीला चौकशी साठी पोलीस कस्टडीची आवश्यकता असल्याचे कोर्ट आदेशात म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. सी डी कुलकर्णी यांनी काम पाहिले.
Post a Comment