सारोळा कासार येथील रहिवासी, रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य श्री. भाऊसाहेब दत्तात्रय कडूस सर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी ८१ वर्षे वयामध्ये नुकतेच पदार्पण केले होते. कै. भाऊसाहेब सर यांनी अतिशय गरीब परीस्थितीतून, प्रचंड मेहनतीने व जिद्दीने बी.एस्सी, बी.एड, एम.ए, एम.एड. असे शिक्षणाचे अनेक टप्पे त्यांच्या विद्यार्थीदशेत पार केले. त्यामुळे त्यांना रयत शिक्षण संस्थेत सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. सरांनी सारोळा कासार, विसापूर, कोतूळ, वाफगाव, टाकळीभान,वाडा, काष्टी, कोळगाव, बेलवंडी अशा अनेक ठिकाणी शैक्षणिक सेंवा देऊन अनेक विध्यार्थ्यांना शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर घडविले. यापैकी कुठल्याही शाखेत आजही गेलात तर सरांबद्दल अत्यंत आदराची भाषा ऐकावयास मिळते.
समाजापुढे असा आपला आदर्श ठेवणारा कै. भाऊसाहेब सर नावाचा हाडाचा शिक्षक, सामाजिक कार्यातही मागे नव्हता. विसापूर येथील रयतची बंद पडलेली शाखा सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी सुरु करून यशस्वीरीत्या चालवून दाखविली. सारोळा कासार येथे विज्ञान विषयाचे ज्युनियर कॉलेज सरांमुळेच उभे राहू शकले. यासाठी नगरमध्ये भाऊसाहेब फिरोदिया कॉलेजला 12 व्या इय्यत्तेत शिकणाऱ्या आपल्या मुलीलाही, नव्याने उभ्या राहणाऱ्या सारोळा कासारच्या ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश देऊ केला. सध्याचे जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. अशोकराव कडूस देखील याच प्रथम तुकडीचे विद्यार्थी. बेलवंडी येथील शाळेची नूतन इमारत सरांच्या प्रयत्नातूनच साकारली गेली. कर्मवीर अण्णांच्या कार्याच्या १ टक्का जरी मला काम करता आले, तरी माझा जन्म धन्य होईल, हि सरांची विचारसरणी होती. त्यामुळे कर्मवीरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून झपाटल्यासारखे सरांनी काम केले.
'पवित्र मजला दगडी निद्रा, दगडाची दुलई करणारी. पवित्र मजला जळजळीत ती, भूक श्रमातून पोसवणारी'
श्रीगोंदा येथील माध्यमिक शिक्षक संघटनेला त्याकाळी सरांनी मोठे बळ दिले. कित्येक वर्षे श्रीगोंदा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. माध्यमिक शालांत परीक्षेच्या एस.एस्.सी. बोर्डासाठी ‘परीक्षक ते नियामक’ म्हणून मोठा काळ त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. कर्मवीर जयंतीला सरांनी रयतच्या विविध शाखांमध्ये राबविलेले अनेक उपक्रम आजही त्यांचे विद्यार्थी आवर्जुन नमुद करतात. जेथे जाईल तेथील सर्व शाळा व परिसरात त्यांनी वृक्षारोपणाला बळ दिले. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले. यातुन सरांच्या पर्यावरण जागरूकतेच्या दूरदृष्टीची निश्चितच कल्पना येते.
विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये बचतीची सवय लागावी, यासाठी ‘संचयनी' सारख्या अल्पबचत योजना त्यांनी रयतच्या विविध शाखांमध्ये राबविल्या. विविध विषयांवरील घोषवाक्य, निबंधस्पर्धा यांचे आयोजन मोठ्या उत्साहात विविध शाखांमध्ये केले. व्यसनमुक्ती, ध्वजदिन, स्थिरचित्रपट असे एक ना अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. त्याबद्ल रयत शिक्षण संस्थेने, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्यांचा गौरव केला. शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देखील सरांना मिळाला. याशिवाय ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर देखील बी एड कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन इत्यादी अनेक उपक्रमांमध्ये ते सक्रीय होते. जेष्ठ नागरिक संघ, अहिल्यानगर यांच्याकडूनही त्यांना ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सम्मानित करण्यात आले.
असे हे बहुआयामी व्यासंगी व्यक्तीमत्त्व, रविवार दिनाक २७/०४/२०२५ रोजी आपल्यातुन हरपले. पंचक्रोशीमध्ये त्यांचा एक
आदरयुक्त दरारा होता. यामुळेच सर्वजण आदराने त्यांना ‘आण्णा’ या नावाने संबोधित
असत. त्यांच्या पश्चात श्री. राम भाऊसाहेब कडूस (वरिष्ठ विकास अधिकारी-आरोग्य
विमा) तसेच डॉ. श्याम भाऊसाहेब कडूस (शास्त्रज्ञ, पशुवैद्यकशास्र,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)
हि दोन मुले, अध्यापनामध्ये कार्यरत असलेल्या तीन शिक्षिका
मुली, माध्यमिक स्तरावर मुख्याध्यापक कार्यरत तीन जावई,
पशुसंवर्धन विभाग तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र
शासनामध्ये कार्यरत दोन सुना, पुतणे व विद्यार्थीदशेतील
नातवडांबरोबरच, सहा
उच्चपदस्थ इंजिनिअर नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशा या शिस्तबद्ध व
शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व
कौटुंबिक क्षेत्रामध्ये भरीव कार्य करणाऱ्या, आदर्श
शिक्षकाला भावपूर्ण आदरांजली...
शब्दांकन - डॉ. विजय बी. मुनोत
सारोळा-कासार, ता.जि. अहिल्यानगर
Post a Comment