मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपाखाली अमोल काळे या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या या आरोपीने आपली चूक देखील मान्य केली आहे. आरोपीला आयटी कायद्याअंतर्गत पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करणारे निखिल भामरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. आरोपी अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. त्यानंतर अखेर भामरे यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर काळे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी लोकेशन शोधून काढले. त्यावेळी ही व्यक्ती पुण्यातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले.
अमोल काळे हा एक विद्यार्थी असून पंकजा मुंडे यांना त्रास देण्यामागे त्याचा हेतू काय होता? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच अमोल काळे हा मूळ बीड जिल्ह्यातील परळी या पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातीलच रहिवासी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Post a Comment