श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील एमआयडीसीमधील एका गोदामातून १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किंमतीची २१ गोण्या पांढर्या रंगाची पावडर व खडे घेवून निघालेला टेम्पो श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघी शिवारात पकडला आहे. ही पावडर अल्प्राझोलम हा अंमलीपदार्थ तयार करण्यासाठी वापण्यात येत असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
श्रीरामपूर येथील एमआयडीमधून एक टेम्पो ड्रग सदृश पावडर घेवून जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख यांना ही माहिती कळविली. त्यानंतर पो.नि. देशमुख यांनी तातडीने पथकासह एमआयडीसी परिसरात तपासणी सुरु केली. थोड्या वेळात दिघी शिवारात एक टेम्पो (क्र.एम एच २० बी टी ०९५१) पोलिसांनी पकडला. त्यात २१ गोण्या पांढरा रंग असलेली पावडर व काही खडे आढळून आले.
टेम्पो चालक मिनिनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, ता.राहाता)यास ही पावडर कोठून आणली याची माहिती विचारली असता त्याने श्रीरामपूर एमआयडीसी मधील गोदामातून हा माल उचलल्याची माहिती दिली. तसेच सदर खडे हे अल्प्राझोलमचे असून पावडर ही अल्प्राझोलम बनविण्यासाठीचा कच्चा माल असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नगरमधून फॉरेन्सिक तज्ञांना बोलावले. त्यांनी पावडरची तपासणी करून सदर माल हा अल्प्राझोलम असून तो अंमलीपदार्थ असल्याचे सांगितले.
दौंड (जि.पुणे) येथील एका कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वी नोकरीस असलेल्या दौंड येथील विश्वनाथ कारभारी शिपनकर याने नोकरी सोडून चार महिन्यापूर्वी श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये भाड्याने घेतलेल्या गोदामातून ही पावडर उचलण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment