पहलगाम हल्ल्यातील २ संशयित दहशतवाद्यांची घरे भारतीय लष्कराने केली उद्ध्वस्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. त्यामुळे या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यात आसिफ शेखचा सहभाग असल्याचा संशय होता. मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे.

लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर होते, ते स्फोट घडवून उडवण्यात आले आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले.

जम्मू-काश्मीर पोलिस या तपासात सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह आदिल आणि आसिफ शेख यांच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते. यावेळी संशयास्पद वस्तू पाहिल्यानंतर धोक्याची भावना जाणवली. हे पाहून सुरक्षा दलाचे जवान ताबडतोब मागे हटले आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. घरात स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच स्फोटक पदार्थांमुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये आसिफ आणि आदिल हे दोघेही दिसत होते. या भ्याड हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. ज्यात आसिफ आणि आदिल यांचा समावेश आहे.

दरम्यान, आदिल शेख या दहशतवाद्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तो २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला होता. पहलगामध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यानेच दहशतवाद्यांना बेसरन खोऱ्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहेत.

0/Post a Comment/Comments