सुपा - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या हंगा (ता.पारनेर) गावच्या शिवारात धारदार हत्यारे असलेली कार सुपा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांची चाहूल लागताच धारदार शस्त्र असलेली कार सोडून आरोपी पसार झाले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पारनेर-सुपा रोडवरील हंगा गावच्या शिवारात हॉटेल साई रेसिडेन्सी येथे १४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मारुती सियाज कंपनीच्या कारमधून (क्र.एम एच १२ क्यू टी ७४४०) अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या आत आरोपी अवैध शस्त्र असलेली कार सोडून पसार झाले आहे.
या कारमध्ये पोलिसांना लोखंडी कटावण्या, लोखंडी कोयते , मोबाईल , स्टीलचे दांडके, बेस बॉलचे दांडके असे अवैध शस्त्रे मिळून आली आहे. दरम्यान, या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात पो.कॉ. विकास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अमोल कर्डिले, सुनील बडे, अर्जुन बडे यांच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम ४/२५, बीएनएस कलम ३ (५), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस एम खैरे हे करत आहेत.
अमोल कर्डिलेवर अनेक गंभीर गुन्हे
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल कर्डिले याच्याविरोधात पारनेर व सुपे पोलिस ठाण्यात १५ पेक्षाही अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो तडीपार होणे अपेक्षित असताना केवळ राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे अमोल कर्डिले मोकाट फिरता असून त्यामुळे सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये त्याच्या कडून दहशत निर्माण केली जात असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
Post a Comment