नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील शेतकरी कुटुंबातील सेंट्रीग कामगार असलेले बबन दत्तु गोरे यांची मुलगी प्रियांका बबन गोरे हिने प्रचंड अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर नीट परीक्षेत ७८५ पैकी ६०० गुण मिळवून संपूर्ण भारतात ११११वी रँक मिळवली आहे. त्यामुळे तिचे सरकारी कोट्यातून एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
१२ वी नंतर उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी मागील मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.१४ जून) ऑनलाईन जाहीर झाला आहे. यामध्ये प्रियंका गोरे हिने हे उज्ज्वल यश मिळविले आहे. प्रियंका हिने रुईछत्तीसी गावातीलच जनता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेवून फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये १२ वी ची परीक्षा दिली होती. त्यात तिला ७९ टक्के गुण मिळाले होते. मागील वर्षी तिने नीट परीक्षा दिली होती.
मात्र त्यावेळी तिला अपेक्षित गुण न मिळाल्याने तिचा एमबीबीएस साठी नंबर लागला नाही, त्यावेळी तिचा बीडीएस किंवा बीएएमएस साठी नंबर लागू शकला असता पण मला एमबीबीएस च व्हायचेय अशी जिद्द मनात ठेवून ती पुन्हा नव्या जोमाने नीट परीक्षेच्या तयारीला लागली. अखेर जिद्दीच्या बळावर तिने यावर्षी नीट परीक्षेत ७८५ पैकी ६०० गुण मिळवून संपूर्ण भारतात ११११वी रँक मिळवली आहे.
प्रियंका हिने मिळविलेल्या या यशाची माहिती मिळताच काबाडकष्ट करून तिला पाठबळ आणि साथ देणारे तिचे वडील बबन गोरे यांचा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर, मुख्याध्यापक पोपट सुर्यवंशी, अंबादास शेटे, नामदेव जगदाळे यांनी पेढे भरवून सत्कार केला.
Post a Comment