नगर तालुक्यात सशस्र दरोडा, मारहाणीत चौघे जखमी, रोकडसह दागिने लंपास


नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील विळद शिवारात असलेल्या नारुंडी तलावाजवळील मेंढपाळाच्या वस्तीवर १० जून रोजी पहाटे १.२० च्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी सशस्र दरोडा टाकत २ महिला व २ पुरुष अशा चौघांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. मारहाणीत जखमी झालेल्या चौघांवर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लक्ष्मण विठ्ठल सूळ, प्रकाश लक्ष्मण सूळ, सुमन लक्ष्मण सूळ आणि शीतल पोपट होडगर अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोपट बन्सी होडगर (वय ३५) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी होडगर व त्यांचे मेव्हणे लक्ष्मण सूळ हे विळद जवळील पिंप्री घुमट येथील रहिवासी असून मेंढपाळ आहेत. त्यांचा मेंढ्यांचा तळ विळद शिवारातील नारुंडी तलावाजवळ होता. फिर्यादी व इतर सर्वजण ९ जून रोजी रात्री जेवण करून मेंढ्यांच्या तळावर पालात झोपलेले होते. १० जून रोजी पहाटे १.२० च्या सुमारास काळे कपडे घातलेले ७ ते ८ अनोळखी दरोडेखोर हातात काठ्या व चाकू घेवून त्यांच्या तळावर आले. त्यांनी फिर्यादीला काठीने मारले असता त्यांनी त्यांच्या कडील कांबळ त्यातील एका दरोडेखोराच्या अंगावर फेकून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा दोघांनी त्यांना पकडले व एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावून आरडा ओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नी जाग्या झाल्या व मदतीसाठी आरडा ओरडा करू लागल्या असता त्यांना ही दरोडेखोरांनी काठीने मारहाण करत चाकू दाखवून धमकी दिली. त्यानंतर तुमच्या जवळील पैसे व दागिने काढून द्या नाहीतर एकालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत फिर्यादीची पत्नी शीतल होडगर, मेव्हणा लक्ष्मण सूळ, प्रकाश सूळ, सुमन सूळ  यांना काठीने बेदम मारहाण करत चाकूने वार केले. तसेच त्यांच्या कडील ७० हजारांची रोकड, सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा १ लाख ५१ हजारांचा ऐवज घेवून तेथून पळून गेले.

या मारहाणीत चौघे जखमी झाले. याबाबतची माहिती पोपट होडगर यांनी नगर तालुका बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ यांना फोन करून सांगितल्यावर त्यांच्या सह पिंप्री घुमट येथून काही नागरिक घटनास्थळी गेले. रभाजी सूळ यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर स.पो.नि. माणिक चौधरी हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसेतज्ञ, श्वान पथकही घटनास्थळी गेले. त्यांनी पाहणी करून दरोडेखोरांचा तपास सुरु केला. मारहाणीत जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोपट बन्सी होडगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांच्या विरुद्ध बीएनएस २०२३ चे कलम ३१० (२), ३११ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. माणिक चौधरी हे करीत आहेत.  

0/Post a Comment/Comments