नगर
तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात एका शेतातील
कडूनिंबाच्या झाडाला एका ३७ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत २८ जून
रोजी सकाळी आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला व अंगावर मारहाणीच्या खुणा असून
शरीरावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला असल्याने त्याचा कोणीतरी अज्ञात
व्यक्तीने मारहाण करून खून करत त्याला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फासावर
लटकवले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सारोळा कासार गावच्या शिवारात टेंभी मंदिराच्या जवळ गट नंबर ७७५/१ या धामणे यांच्या शेतात बांधाला असलेल्या कडूनिंबाच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकलेला सकाळी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला त्यांनी ही माहिती नगर तालुका पोलिसांना कळविली ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या समवेत पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, भरत धुमाळ, पोलिस अंमलदार राहुल थोरात, शिवाजी माने, अन्सार शेख, बाबासाहेब खेडकर, विक्रांत भालसिंग, रवी सोनटक्के, मंगेश खरमाळे, पोपट गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शरीरावर प्रचंड रक्तस्राव झालेला होता. डोक्याला व पायाला जखमा होत्या. मृतदेह फक्त बनियन व अंडरवेअर वर होता. तो खाली घेतल्यावर त्याला ज्या पंचाने लटकवलेले होते त्यात त्याचे आधारकार्ड, मतदान कार्ड व इतर कागदपत्रे पोलिसांना मिळाली असून त्यावरून त्याचे नाव पेजन सिंह कुंदनलाल विश्वकर्मा (वय ३७, रा. जमालपुरा, भोपाळ, मध्यप्रदेश) असल्याचे समोर आले आहे.
पोलीसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून
त्याची ओळख पटली आहे. तो भोपाळ वरून महाराष्ट्रात कसा आला. अहिल्यानगर जिल्ह्यात
सारोळा कासार परिसरात कसा आला, कुठे काम करत होता याचा शोध
पोलिस घेत आहेत.
Post a Comment