हगवणेंपेक्षा धक्कादायक! ८० तोळे सोने, ७० लाखांची व्हॉल्वो कार देऊनही छळ, अखेर नवविवाहितेची आत्महत्या



तिरूप्पूर - मुळशी येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या छळाला कंटाळून मागील महिन्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर हगवणे कुटुंबाचे कारनामे जगासमोर आले होते. लग्नात कोट्यवधींचा खर्च, भरमसाठ हूंडा घेऊनही वैष्णवी यांचा छळ सुरू होता. अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ८० तोळे सोने अन् ७० लाखांची व्हॉल्वो कार हुंड्यात देऊनही नवविवाहितेचा छळ झाल्याने तिनेही आपले आयुष्य संपवले आहे.

तमिळनाडू राज्यातील तिरूप्पूर येथील ही घटना आहे. रिधन्या अण्णादुराई या २७ वर्षांच्या नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून रविवारी (दि.२९) आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रिधन्याचे वडील अण्णादुराई हे एका गारमेंट कंपनीचे मालक आहेत. कविनकुमार या तरूणाशी एप्रिल महिन्यातच त्यांचा विवाह झाला होता.

लग्नामध्ये कविनकुमारच्या कुटुंबाने ८० तोळे सोने आणि ७० लाख रुपयांची व्होल्वो कार हुंडा म्हणून घेतली होती. पण त्यानंतरही त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. केवळ दोन महिन्यांतच तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले. रविवारी मंदिरात जाते, असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. कारने घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर कीटकनाशक गोळ्या त्यांनी खाल्ल्या.

स्थानिकांना एक कार बराच वेळ थांबल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास केल्यानंतर कारमध्ये रिधन्याचा मृतदेह आढळून आला. तिच्या तोंडाला फेस आला होता. त्याआधी तिने वडिलांना सात ऑडिओ मेसेज पाठवले होते. त्रास सहन होत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे. पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांना अटक केली आहे.

रिधन्याने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, कविन आणि त्याच्या आई-वडीलांनी मला या लग्नात अडकविण्याचे षडयंत्र रचले होते. मी त्यांचा रोजचा मानसिक त्रास सहन करू शकत नाही. याविषयी कुणाशी बोलावे, हे मला माहिती नाही. मी सांभाळून घ्यावे, असे काही लोकांना वाटते. आयुष्य असेच असते, असे ते सांगतात. पण ते माझा त्रास सहन करू शकत नाही. मी खोटे बोलतेय, असे तुम्हालाही वाटत असेल, पण तसे नाही.

मी आयुष्यभर तुमच्यावर बोजा बनून राहणार नाही. यावेळी मी कोणतीही चूक केलेली नाही. मला असे जगणे पसंत नाही. ते मला मानसिकदृष्ट्या त्रास देत असून कविन मला शारीरिक त्रास देत आहे. मी माझे आयुष्य आता जगू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यासाठी आशेचा किरण होता, पण मी तुम्हाला खूप दु:ख दिले. तुम्हाला ते मोकळेपणाने बोलू शकत नाही. तरीही तुम्ही मला या अवस्थेत पाहू शकत नाही. मला माफ करा, सगळे संपले आहे. मी जात आहे, असे रिधन्याने ऑडिओमध्ये म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments