कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, भाजपाचे आ. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस वर गुन्हा दाखल


सुपा (प्रतिनिधी) - आष्टी (जि. बीड) येथील भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या नावावर असलेल्या कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत हॉटेल व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.७ जुलै) रात्री १०.३० च्या सुमारास नगर पुणे महामार्गावर जातेगाव फाटा (ता.पारनेर) येथे घडली. .धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा कार चालवत होता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द, ता.पारनेर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत नितीन शेळके यांचे जातेगाव फाटा येथे सह्याद्री हॉटेल आहे. रात्री १०.३० च्या सुमारास ते हॉटेल वरून पळवे येथे घरी जाण्यासाठी मोटारसायकल वर निघाले. महामार्गावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ते यु टर्न मारत असताना नगरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या एम.जी. कंपनीच्या ग्लॉस्टर कारने (क्र. एमएच २३ बी जी २९२९) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर उडून पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी सुपा येथील रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सोमनाथ दिवटे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताला कारणीभूत ठरलेली कार व त्यात असलेले सागर सुरेश धस व त्याच्या एका मित्राला त्याब्यात घेतले. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तर मयत नितीन शेळके यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मंगळवारी (दि.८ जुलै) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत शेळके यांच्यावर पळवे येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत नितीन शेळके यांच्या पश्चात पत्नी, २ लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.नितीन शेळके यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला तेथेच २ वर्षापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके यांचाही अपघाती मृत्यू झाला होता, तर त्यांच्या चुलत्यांचाही त्याच ठिकाणी अपघाती मृत्यू झालेला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी दुपारी उशिरा सुपा पोलिस ठाण्यात सागर सुरेश धस (रा.आष्टी, जि.बीड) याच्या विरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल पोपट शेळके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.      

0/Post a Comment/Comments