बिबट्याने रात्री उचलून नेलेल्या बालिकेचा मृतदेह सकाळी सापडला, नगर तालुक्यात खळबळ


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ११ नोव्हेंबर रोजी कामरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता खारे कर्जुने येथून घरच्यांसमोर बिबट्याने ५ वर्षाच्या मुलीला उचलून नेले. रियांका सुनील पवार असे तिचे नाव आहे. तिचा मृतदेह तब्बल १२ तासांच्या शोध कार्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, खारेकर्जुने येथे शेतात काही कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करत आहेत. शेतावर वस्ती असल्याने कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही पाच वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. त्याचवेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि घरच्या लोकांच्या समोर रियांकाला उचलून नेले. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही हाती लागले नाही. गावातील लोकांना ही माहिती समजताच त्यांनी वस्तीवर मोठी गर्दी केली. गावातील लोकांनी शोधमोहीम हाती घेतली, पण रियांका सापडली नाही. पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. श्वान पथकानेही शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. अखेर सकाळी उजाडल्यावर तिचा मृतदेह हिंगणगाव रस्त्यावर शाळेच्या पाठीमागे आढळून आला. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याला ठार करेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा

दरम्यान ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, तसेच संपूर्ण गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच बिबट्याला पकडून ठार करेपर्यंत मृत बालिकेवर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिलेला आहे. वन विभागाने तातडीने नरभक्षक बिबट्याचा शोध घेवून त्याला ठार मारावे या मागणी साठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. वन विभागाने रात्री पासूनच सदर नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरु केलेली आहे. सकाळी गावच्या परिसरात ३ पिंजरे लावण्यात आलेले असून अजून ७ ते ८ पिंजरे लावण्यात येणार आहेत. सहाय्यक उपवनसंरक्षक अश्विनी दिघे, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल नितीन गायकवाड, वन्य प्राणी अभ्यासक हर्षद कटारिया यांच्या सह वनकर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

वनविभागाचा हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप

दरम्यान तहसीलदार संजय शिंदे यांनी खारेकर्जुने येथे मृत बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार, बी.डी. कोतकर यांच्या सह ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले, नगर तालुक्याच्या पश्चिम भागात गावागावात बिबट्यांचा वावर वाढला आहे. वन विभागाला सांगूनही त्यांच्या कडून हलगर्जीपणा केला जात आहे. त्यामुळे बिबटे मानवांवर हल्ले करू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मधून वन विभागाला बिबटे पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. ज्या गावांत बिबट्यांचा वावर आहे, तेथे तातडीने पिंजरे बसविण्यात यावेत. तसेच मृत बालिकेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत शासनाकडून मिळवून द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments