पारनेर मध्ये राजकीय पदाधिकाऱ्याकडून गुंडगिरीचा कळस, 'बीड'सारखी धक्कादायक घटना



पारनेर - बीड च्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड ज्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामुळे झाले. तशीच घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी ५.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील दरोडी शिवारात घडली. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली तसेच सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करत खंडणी साठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) याच्यासह त्याच्या ७ ते ८ साथीदारांवर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुरक्षारक्षक राजेंद्र दौलत घुले (वय ३०, रा. कारेगाव, ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी अभिनव एन्टरप्रायजेस या कंपनीच्या सेनवियान या पवन चक्की च्या कार्यालयात असताना सायंकाळी ५.३० च्या सुमारास तेथे विकास पवार आला आणि त्याने फिर्यादी यांची गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू येथे कामाला कसा येतो असे म्हणत त्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यावेळी तेथे पवार याचे आणखी ७ ते ८ साथीदार आले. त्यांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात घुसून खिडकीच्या काचा, संगणक प्रणाली तसेच फिर्यादीच्या मोबाईलची तोडफोड केली.

यावेळी विकास पवार हा फिर्यादी घुले यांना म्हणाला तू जर परत येथे कामास आला तर तुला जीवे ठार मारील अशी धमकी दिली. तसेच तुझे मालक चंद्रभान ठुबे यांना निरोप दे की, येथे पवनचक्की सुरु ठेवायची असेल तर मला दर महिन्याला २ लाख रुपये हप्ता द्यावा लागेल. असे म्हणत त्याने घुले यांच्या खिशातील २२ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुंडगिरीमुळे पारनेर मध्ये खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments