अहिल्यानगर – लवकरच होवू
घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे,
याच गदारोळात शनिवारी रात्री नगर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत
देणारी घटना घडली आहे. तारकपूर परीरसात एका हॉटेल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे काही माजी
नगरसेवक यांचा भाजपात प्रवेश आयोजित केला होता. या कार्यक्रमात अचानक कॉंग्रेसचे ज्येष्ठ
नेते भानुदास कोतकर यांची एन्ट्री झाली. त्यामुळे नगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे
संकेत मिळाले आहेत.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक
अनिल बोरुडे यांच्यासह काहींचा प्रवेश सोहळा शनिवारी (दि.१५) रात्री हॉटेल
व्ही स्टार येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,
भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, धनंजय जाधव यांच्या
सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम सुरु झाला आणि अचानक कॉंग्रेसचे ज्येष्ठ
नेते भानुदास कोतकर यांचे या कार्यक्रम स्थळी आगमन झाले. त्यांचे पालकमंत्री विखे यांच्यासह
सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
या स्वागताचे फोटो आणि
व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाले. कोतकर समर्थकांनी फक्त बॉस असे लिहून
त्यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला. या सर्व घडामोडी पाहता हा फक्त ट्रेलर होता,
पिक्चर अभी बाकी है. हाच संदेश कोतकर समर्थकांनी दिला आहे असे म्हंटल तर वावगे ठरू
नये.
याचे कारण म्हणजे कोतकरांचे
नगर शहराच्या राजकारणात मोठे वलय आहे, पण हेच वलय कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच
सोयऱ्यांच्या कडून कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कोतकर समर्थक करत आहेत.
गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी याचा प्रत्यय आलेला आहे. कोतकारांचे सोयरे
असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार संग्राम जगताप आणि कोतकर यांच्यात वितुष्ट आल्याचे
जगजाहीर झालेले आहे. आ.जगताप यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत महापालिका
निवडणुकीत कोतकरांना बरोबर घेण्याचा विषयच नाही असे स्पष्ट केले होते.
मात्र मागील काळात माजी
आमदार अरुण जगताप तसेच नुकतेच आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाल्याने जगताप कोतकर
एकत्र दिसले होते. आता सर्व काही अलबेल होईल असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते.
मात्र भानुदास कोतकर यांनी थेट भाजपाच्या व्यासपीठावर जावून खेळलेली चाल वेगळेच संकेत
देत असल्याचे दिसत आहे. आमदार संग्राम जगताप यांचा नगर शहरातील उधळलेला वारू रोखण्यासाठी
पालकमंत्री विखे पाटील आणि भाजपा काहीतरी वेगळेच करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसते.
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजपा स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढविण्याची शक्यता
जास्त आहे, त्यासाठीच भानुदास कोतकर यांना आपल्या बरोबर घेण्याची ही चाल खेळली गेली
असण्याची दाट शक्यता आहे.

Post a Comment