राहुरी - राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात बिबट्या थेट घरात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुहा येथील कोळसे वस्ती आणि वाबळे वस्ती परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या वावर असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर ही परिस्थिती अधिक गंभीर झाली.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्या थेट जगन्नाथ कोळसे यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. अचानक घरात घुसलेल्या बिबट्यामुळे कोळसे कुटुंबाची मोठी ताराबंळ उडून पूर्णपणे धास्तवले होते. सुदैवाने कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान बाळगत सुरक्षित ठिकाणी पलायन केले. मात्र बिबट्याने घरातील वस्तूंचे काही प्रमाणात नुकसान केले असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बाहेर न फिरण्याचे आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. गावात भीतीचे वातावरण असून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभाग, स्थानिक पोलिस आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांनी परिस्थितीवर नजर असून बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Post a Comment