पंढरपूरला चाललेल्या दिंडीतील वारकऱ्याचा नगर सोलापूर रोडवर अपघातात मृत्यू

नगर तालुका (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नगर मार्गे पंढरपूरकडे चाललेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी मधील वारकऱ्याचा भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची घटना नगर सोलापूर महामार्गावर दहीगाव (ता.नगर) परिसरात २४ जून रोजी रात्री ८.३० ते ८.४५ च्या सुमारास घडली.

दत्तू किसन उगले (वय ६५, रा. लोखंडेवाडी, ता.दिंडोरी, जि. नाशिक) असे या मयत वारकऱ्याचे नाव आहे. मयत दत्तू उगले हे त्यांच्या पत्नीसोबत या दिंडीत आलेले होते. दिंडीने नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात मुक्काम केल्यानंतर ती २४ जून रोजी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली होती. रात्री या दिंडीचा मुक्काम साकत या गावात होता. दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी रात्री जेवण केल्यावर उगले पती पत्नी हे दहीगाव येथे परिचित व्यक्तीच्या घरी मुक्कामासाठी पायी चालले होते. दहीगावच्या राम मंदिरासमोर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने उगले यांना जोराची धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंडीतील व्यवस्थापक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेले नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी व पथकाने अपघात करणाऱ्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सदर दुचाकीस्वार हा अपघात झाल्यावर तेथून लगेच पसार झाला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments