ई-पंचनाम्यात केला घोटाळा: क्लार्कने शेतकऱ्यांचे १.२० कोटी नातलगांच्या खात्यावर वळवले



 जळगाव - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केल्यानंतर ही माहिती शासनाच्या ई-पंचनामा या पोर्टलवर भरली जाते. या पोर्टलवर शेतकऱ्यांची नावे, आधार कार्ड आणि ७/१२ उतारा यावरील नावांची पडताळणी न करता केवळ नोंदवलेल्या आधार नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट पैसे वर्ग केले जातात. पोर्टलमधील सुरक्षेबाबतच्या या त्रुटीचा गैरफायदा पाचोरा तहसीलचा महसूल सहायक अमोल सुरेश भोई याने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या नावांपुढे स्वतःचे नातेवाईक, ओळखीच्या लोकांचे आधार क्रमांक टाकले आणि त्या खात्यांवरून १ कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपये काढून घेतले. यासाठी त्याने स्वत:कडे असलेल्या तहसीलदारांचे लॉगिन आयडी, पासवर्डचा वापर केला. याप्रकरणी भोई यास अटक केली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सलग दुसऱ्या वर्षी शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांची दिवाळीही अंधारात आहे. दरम्यान, याच कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त असलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने काही जणांचे आधार नंबर पुरवल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे. लवकरच तेही स्पष्ट होईल.

असा उघडकीस आला घोटाळा

बदलीनंतरही भोई पासवर्ड बदलू देत नव्हता. पोर्टलवरील यादी गावात प्रसिद्ध करण्यापूर्वी ती ग्रुपवर टाकली हाेती. ती पाहताच भोईने संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने यादी डिलीट कर, असे सांगितले. ती डिलीट करण्यापूर्वीच तलाठ्याने यादी प्रसिद्ध केली अन् अपहाराचे बिंग फुटले.

बदली नको म्हणून बोगस पत्र

अमोल भोई ऑगस्ट २०२१ ते मे २०२५ या काळात पाचाेरा येथे होता. त्याची चाळीसगाव येथे बदली झाली. बदली हाेऊ नये म्हणून त्याने थेट तहसीलदारांच्या नावे बनावट पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचा त्याचा एक कारनामा समोर आला आहे.

शेतकऱ्यांना लवकरच मदत देऊ

चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता ज्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही त्यांना लवकरच मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाेर्टलवरील काही त्रुटी दूर कराव्यात म्हणून वरिष्ठांना पत्र दिले आहे. - विजय बनसोडे, तहसीलदार, पाचोरा.

क्लार्कने कसा केला घोटाळा ते या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून समजून घ्या

  • २०२२ मध्ये अमोल भोई याने १२२ शेतकऱ्यांच्या नावे ३६ लाख ३९ हजार ९६५ रुपये काढले.
  • २०२४ मध्ये नुकसान झालेल्या २२५ शेतकऱ्यांच्या नावे आलेले ८३ लाख ७३ हजार ५५२ रुपये भोई याने काढून घेतले.
  • कोणतीही तक्रार न आल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भोईने ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा हे अनुदान लाटले.
  • तलाठ्यांनी पंचनाम्याची सही-शिक्का असलेली प्रत तहसील कार्यालयात जमा केली. ही माहिती ई-पंचनामा पोर्टलवर भरण्याची जबाबदारी अमोल भोई याच्यावर होती.
  • तहसीलदारांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्याने वापरला. कुणाला संशय येऊ नये म्हणून अर्जांच्या गठ्ठ्यात भोईने स्वत:कडील काही बोगस पंचनाम्यांचे अर्ज जोडले.
  • पोर्टलवर माहिती भरताना नाव मूळ शेतकऱ्यांचे आणि आधार क्रमांक मात्र स्वत:कडचे नोंद केले.
  • शेतकरी संख्या व नावे बरोबर असली तरी त्यांचे आधार नंबर मात्र बदलण्यात आले होते.

पंचनामा पोर्टलवर सुधारणा आवश्यक

  1. शेतकऱ्यांना पोर्टलवर गावनिहाय संपूर्ण यादी पाहता यावी.
  2. माहिती भरल्यानंतर मोबाइलवर मेसेज, ओटीपी यावा.
  3. अनुदान मंजूर झाल्यावर यादी पोर्टलवरच सार्वजनिक करणे बंधनकारक.

परिणाम

शासनाने अतिवृष्टीचे अनुदान दिले, पण घोटाळ्याने पाचोऱ्यातील शेतकऱ्यांना मिळालेच नाही

पोर्टलमध्ये त्रुटी

शेतकऱ्यांचे नाव व आधार कार्ड नंबर पडताळणी होत नसल्याचा घेतला गैरफायदा

0/Post a Comment/Comments