गावातील किराणा दुकानदाराला खंडणी मागत तिघांनी दिली जीवे मारण्याची धमकी


नगर तालुका (प्रतिनिधी) - किराणा व्यापाऱ्याला १ लाख ७० हजारांची खंडणीची मागणी करत रात्रीच्या वेळी दुकान फोडू, खोटे गुन्हे दाखल करू तसेच तुझ्यासह कुटुंबियांना जीवे ठार मारू अशी धमकी देण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील कामरगाव येथे २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

याबाबत चेतन विजय गुगळे (वय ३७, रा. कामरगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे गावात किराणा दुकान आहे. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या दुकानात तुषार सावत्या भोसले, सावत्या अकल्या भोसले, प्रीती तुषार भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) हे आले आणि फिर्यादी यांना उधार किराणा माल मागू लागले. त्यावेळी फिर्यादी यांनी तुमच्या कडे २ वर्षापासून उधारी असून ती अगोदर द्या अशी मागणी केली. अगोदरची उधारी दिल्यावर तुम्हाला किराणा देतो असे ते म्हणाले.

त्यावेळी तुषार आणि सावत्या यांनी तुझी आमच्या कडे कुठलीच उधारी नाही, तूच आम्हाला १ लाख ७० हजार रुपये दे नाहीतर तुझ्यावर खोटी केस करू, रात्री तुझे दुकान फोडून तुला व तुझ्या कुटुंबाला उचलून नेवून मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच प्रीती भोसले हिला यापूर्वी ही किराणा मालाची उधारी मागितली असता तिने पैशाची मागणी करत धमकी दिली असल्याचे गुगळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०८ () (), ३५२, ३५१ () () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments