अहिल्यानगर शहरात धार्मिक तणाव, मुस्लिम समाजाचा रास्ता रोको, दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत 'आय लव्ह मोहम्मद' हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी (दि.२९ सप्टेंबर) सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिस ठाण्याबाहेर जमावाने निदर्शने करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्च केला. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या जमावाने कोठला परिसरात महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्याला वेगळे वळण लागून काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२९ सप्टेंबर) सकाळी बारातोटी कारंजा परिसरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीत इंग्रजी अक्षरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नाव रेखाटण्यात आले होते. त्यानंतर या नावावरून दौड नेण्यासाठी व्यवस्था करून देत जाणीवपूर्वक अपमान केला, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारा तोटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
कोठला परिसरात महामार्गावर रास्तारोको
या घटनेनंतर व पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आक्रमक झालेला मुस्लिम समाज कोठला परिसरात महामार्गावर उतरला. जमावाने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही युवकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागले. पोलिसांनी तत्काळ आंदोलकांवर लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यामुळे पळापळ झाली. या घटनेमुळे कोठला परिसरात व संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड प्रकरणी २२ युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दगडफेक करणाऱ्यांना समाजकंटकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी एका समाजकंटकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवर रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ज्यांनी रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतरही काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोठला येथे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यांना विनंती केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मी सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आवाहन करतो की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अहिल्यानगर शहरात शांतता आहे. दगडफेक करणाऱ्यांना समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे पोलिस अधीक्षक म्हणाले.
दुर्गामाता दौड मार्गावर हाडे व मांसाचे तुकडे फेकल्याचा आरोप
अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौड ही संभाजी भिडे यांच्या नेतृत्वातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित करण्यात आली होती. या दौड च्या मार्गावर हाडे व मांसाचे तुकडे फेकल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत देविदास भीमराव मुदगल (वय ४५, रा. गाडगीळ पटांगण, नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या मध्ये म्हंटले आहे की, आम्ही गेल्या २५ वर्षांपासून बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मंगलगेट अशी दुर्गामाता दौड काढत आहोत. सोमवारी (दि.२९ सप्टेंबर) आम्ही सर्वजण त्यासाठी जमलो होतो. दौड जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. आमची दौड ही माळीवाडा, केवल हॉस्पिटल ते बुरुडगल्ली जात असताना बॉम्बे बेकरी जवळ या मार्गावर कोणी तरी अज्ञात समाजकंटकाने हाडे व मांसाचे तुकडे फेकल्याचे निदर्शनास आले. यामुळे आम्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात समाजकंटका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment