अहिल्यानगर
: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे
आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे
यांनी बुधवारी जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण
विखे-पाटील यांची शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतल्यामुळे राजकीय
वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, भांगरे यांनी आपल्या आई,
सुनीता भांगरे यांच्यासह विखे-पाटलांशी बंद दाराआड चर्चा केल्याने
त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बंद दाराआड नेमके
काय शिजले? याची जोरदार चर्चा होत आहे. या बैठकीला भाजपचे
माजी आमदार वैभव पिचड यांचीही उपस्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांतील भांगरे आणि
विखे-पाटील यांच्यातील ही दुसरी भेट असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना आणखीनच जोर
आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महत्त्वाच्या घडामोडी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आगामी
अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भांगरे
यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अमित भांगरे यांच्या आई, सुनीता भांगरे या अकोले तालुक्यातून जिल्हा
परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अध्यक्षपदाचे आरक्षण आणि सुनीता भांगरे यांची
निवडणूक लढवण्याची तयारी पाहता, त्यांना भाजपच्या माध्यमातून
संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या
भेटींमुळे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित भांगरे हे शरद पवारांची साथ
सोडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. भांगरे लवकरच भाजपात प्रवेश करणार
असल्याची दाट शक्यता राजकीय गोटात व्यक्त होत आहे.
भांगरे
यांनी लढवली होती विधानसभा निवडणूक
अमित
भांगरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मागील वर्षी
विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी अनेक जाहीर सभांमध्ये 'आम्ही बाप बदलत नाही, माझा
राजकीय बाप शरद पवारच' असे ठामपणे सांगितले होते. मात्र,
आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बदललेल्या राजकीय
समीकरणांमुळे त्यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे. विखे-पाटलांशी झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीनंतर भांगरे
आता नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'ला मोठा धक्का बसण्याची
शक्यता आहे.

Post a Comment