रात्रीच्या वेळी रस्ता लुट करणारी टोळी पकडली, नगर तालुक्यातील दोघांचा समावेश


अहिल्यानगर – रात्रीच्या वेळी कार अडवून कारचालकाला गुप्तीचा धाक दाखवत २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ३७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या ६ जणांच्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या टोळीत एका तरुणीचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून ती तरुणी आणि अन्य २ आरोपी अद्याप फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून ११ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी कार्तिक सचिन मिसाळ (वय २०, रा. खेडकर मळा ता. श्रीगोंदा) हे ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या  सुमारास वडाळी रोडला लोखंडे मळ्याचे टेकडीवर श्रीगोंदा येथे जात असतांना त्यांच्या गाडीला एक पांढ-या रंगाची स्विप्ट गाडी आडवी लावुन त्यांना गुप्तीचा धाक दाखवुन त्यांचेकडील २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ३७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल बळजबरीने चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.  पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गेयांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार केले होते.

या पथकाने घटना ठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती संकलित केली. १३ ऑक्टोबर रोजी सदर आरोपीचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा प्रथमेश शिंदे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपींची माहिती काढत असतांना पथकास सदर आरोपी हे त्यांचेकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारने पारगांव फाटा श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे पारगांव फाटा सापळा रचुन थांबले असता दोन कार पारगांव फाट्याकडे येतांना दिसल्या. पोलीस पथकाने सदरची कार अडवुन कारमधील अनिकेत गोरख उकांडे (वय २६, रा. अकोळनेर ता. नगर), प्रथमेश शिवनाथ शिंदे (वय २२,  रा. शिवाजी चौक, श्रीगोंदा), विजय शहाजी देशमुख (वय ३०, रा. नळवणे ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे कसून चौकशी केल्यावर प्रथमेश शिंदे याने सदरचा गुन्हा हा माझी मैत्रिण मयुरी आनंदा पाटील (ता. नातोशी ता.पाटण जि.सातारा), बंडु उर्फ सागर भिमराव साळवे (रा.बाबुर्डी बेंद ता.नगर), प्रतीक धावडे (पुर्ण नांव माहिती नाही रा. तांदळी दुमाला, ता. श्रीगोंदा) अशांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.  आरोपींचे ताब्यातुन गुन्ह्यातील मोबाईल फोन, गुन्ह्याचे वेळी वापरलेली दोन कार असा एकुण ११ लाख १० हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर या पूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.

0/Post a Comment/Comments