अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शहरातील एका 18 वर्षीय युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केल्याची आणि त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून, पीडितेच्या फिर्यादीवरून शनिवारी (11 ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवती 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक येथे केडगावला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यावेळी तिच्या ओळखीचे असलेले रेहान शेख व मुज्जमील शेख हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी ‘आम्ही तुला केडगावला सोडतो’, असे म्हणत तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्या दोघांना युवतीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत कायनेटिक चौकातून अरणगावच्या दिशेने नेले. केडगाव शिवारातील ‘500 बंगला’ नावाच्या एका अपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी तिला नेण्यात आले.
तेथे आधीपासूनच सरवर बॉस नावाचा तिसरा व्यक्ती हजर होता. या तिघांनी चाकूचा धाक दाखवून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. दरम्यान त्याच वेळी रेहान शेख याने पीडितेचे नग्न फोटो काढले आणि ही गोष्ट कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘आमच्यावर अनेक गुन्हे आहेत, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही’, अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर पीडितेला मध्यरात्री केडगावमधील सोनेवाडी फाट्यावर सोडून दिले. पोलिसांनी रेहान रऊफ शेख, मुज्जमील शेख (दोघे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) आणि सरवर बॉस (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Post a Comment