इंस्टाग्राम वरील ओळखीतून अहिल्यानगर मध्ये तरुणी झाली 'लव्ह जिहाद'ची शिकार, अन् घडले भयंकर



अहिल्यानगर - इंस्टाग्राम वर झालेल्या ओळखीतून २१ वर्षीय तरुणीशी जवळीक वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवत भेटायला बोलावले. त्यानंतर केडगाव मधील एका पान टपरीमध्ये तिला कोंडून ठेवत अत्याचार केले. तिने लग्नाचा विषय काढल्यावर टाळाटाळ करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पुण्यात एका कंपनीत काम करत असलेल्या तरुणीने दिलेल्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिसांनी जहीद फारुख तांबोळी (रा.केडगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

पिडीत तरुणी गेल्या ४ वर्षांपासून इंस्टाग्राम वापरत असून त्यावरच तिची आरोपी जहीद तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे इंस्टाग्राम च्या माध्यमातून तसेच मोबाईल च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. गतवर्षी ती तरुणी काम शोधण्यासाठी नागपूर हून पुण्यात गेली, तेंव्हा जहीद तिला भेटायला पेरणे फाटा येथे गेला होता. त्यानंतर त्यांचे फोन वर नेहमी संभाषण होत होते. जहीद हा तिला आपण लग्न करू असे वारंवार म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्यास होकार कळविला व १६ सप्टेंबर रोजी पहाटे त्याला पहिल्यांदा भेटण्यासाठी ती बसने नगरमध्ये आली. 

त्यावेळी पुणे बसस्थानकावरून त्याने तिला दुचाकीवर केडगाव येथे त्याच्या लहर पान शॉप येथे नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर त्या पान टपरीत तिला कोंडून ठेवले. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास दौंड रोडवरील एका लॉज मध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढला असता. नंतर पाहू, तू आता पुण्याला जा असे सांगून तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. तिला शिवीगाळ करत दमदाटी केली. 

त्यामुळे आरोपी जहीद याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक अत्याचार केला व नंतर लग्नास टाळाटाळ करत फसवणूक केली असल्याचे पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी जहीद तांबोळी याच्या विरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी पहाटे बीएनएस कलम ६९, ३५१ (२), ३५२, १२७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments