अहिल्यानगर - मुंबई मधील एका ३० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर मुंबई आणि पालघर येथील फार्म हाऊस येथे शारीरिक अत्याचार करत नंतर लग्नास नकार देवून धमकावल्या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (मूळ रा. अकोले, ता.इंदापूर, जि.पुणे) यांच्यावर २२ सप्टेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा पुढील तपासासाठी मानोर जि.पालघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची पिडीत महिला ही मुळची हुबळी, पश्चिम बंगाल येथील असून ती कामानिमित्ताने मुंबईत वास्तव्यास आहे. पोलिस निरीक्षक दराडे यांची त्या महिलेशी सन २०२३ मध्ये मुंबईत ओळख झाली होती. त्यानंतर दराडे यांनी तिच्याशी जवळीक वाढवत तिला लग्नाचे आमिष दाखवत ऑगस्ट २०२३ ते २२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मुंबई तील जोगेश्वरी वेस्ट येथील घरी तसेच पालघर जिल्ह्यातील मानोर येथील एका फार्महाऊस वर तिच्याशी तिची इच्छा नसताना शरीर संबंध केले. त्यानंतर फिर्यादीवर ओरडून आपल्यातील असलेले अफेअर विसरून जा असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हिने तुमच्यावर केस करीन असे म्हंटले असता तुला काय करायचे ते कर, असे म्हणून जीवे मारण्याची व केस करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादी वरून पोलिसांनी पोलिस निरीक्षक दराडे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ६९, ३५२, ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पालघर जिल्ह्यातील मानोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो तपासासाठी मानोर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
एका पोलिस निरीक्षकाविरुद्ध महिलेने पोलिस अधिक्षकांकडे गंभीर स्वरुपाची तक्रार केल्याची चर्चा गेल्या ३ - ४ दिवसांपासून पोलिस दलात सुरु होती. तर काहीजण हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करत होते. सदर महिलेला पोलिस अधिक्षकांनी २ दिवसांपूर्वीच एका महिला पोलिस अधिकाऱ्यासमवेत फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात पाठविले होते. ती महिला पोलिस ठाण्यात गेलीही होती.
मात्र फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याविरोधात फिर्याद असल्याने ती दाखल करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची चर्चाही सुरु झाली होती. मात्र २२ सप्टेंबर रोजी दुपारी हा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवालीच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्त असताना बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. या पूर्वीही या पोलिस ठाण्यात काम केलेल्या एका पोलिस निरीक्षकावर नगर मधील एका महिलेने गुन्हा दाखल केला होता.
Post a Comment