नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार नगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात उघडकीस आला असून पोलिसांनी तेथे छापा टाकत गांजाची लहान मोठी ८६ झाडे जप्त केली आहेत. ही लागवड करणारा गणेश हरिभाऊ पाचारणे (रा.नेप्ती, ता.नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
निमगाव वाघा शिवारात एका व्यक्तीने शेतात गांजाची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळाली होती. त्यानंतर स.पो.नि.गिते यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड, पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे, लाड, दाते, पो.कॉ. विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने ३ सप्टेंबरला सायंकाळी त्या ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता शेतात लहान मोठी ८६ गांजाची झाडे लावलेली आढळून आली. सदरचे शेत हे नेप्ती येथे राहणारा गणेश हरिभाऊ पाचारणे याचे असून त्यानेच ही झाडे लावल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच शेतातील ही गांजाची ८६ झाडे जप्त केली.
या प्रकरणी पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गणेश पाचारणे याच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम ८ (ब), २० (ब), ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.
Post a Comment