नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूर्तीच्या चौथऱ्यावर पाठीमागील बाजूस अज्ञात समाज कंटकाने मांसाचे तुकडे ठेवून विटंबना केल्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरलेले असून पोलिसांनी तातडीने या समाजकंटकांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण वातावरण पसरलेले आहे.
गावच्या वेशीबाहेरच पुर्वामुखी हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी दर्शनाला गेल्यावर हा प्रकार काहींच्या निदर्शनास आला. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले, अनेक ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने मंदिराजवळ जमा झाले. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते हे मोठ्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. काही वेळातच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वमने हे ही फौजफाट्यासह गावात आले. रॅपीड अॅक्शन फोर्स ची तुकडीही आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर ग्रामस्थांनी आक्रमक पणे आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आम्ही तपास सुरु केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
त्यानंतर सारोळा कासार येथील युवक व ग्रामस्थांनी तातडीने मंदिराची स्वच्छता करून शुद्धीकरणाचा विधी केला. श्री हनुमान मूर्तीला पाणी व दुधाने अभिषेक करून आरती, हनुमान चालीसा आदींचे पठण करण्यात आले व मंदिराचे पावित्र्य पुनर्स्थापित करण्यात आले.
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शांततेत या घटनेचा निषेध नोंदवला. सारोळा कासार गावात सर्व जातीधर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहात आहेत. गाव सुशिक्षित आहे. परंतु गावात इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने गावातील शांतता, ऐक्य व बंधुभाव याला बाधा आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Post a Comment