नवी दिल्ली: पितृपक्ष संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नवरात्रीच्या सुमारास सत्ताधारी पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत गणितं बदलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन दोघेही ओबीसी आहेत. त्यामुळे आता भाजपकडून ब्राह्मण चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी देऊ शकतो.
दलित समाजातून आलेल्या रामनाथ कोविंद यांना भाजप नं राष्ट्रपती पदावर संधी दिली. विद्यमान राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यामुळे आता भाजपच्या अध्यक्षपदी ब्राह्मण नेत्याला संधी मिळावी अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे. भाजप आणि संघाच्या निकटवर्तीयानं आणि विश्वसनीय सुत्रानं एनबीटी ऑनलाईनला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. 'जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची जातीय गणितं बदलली आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या किमान दोनदा बैठका झाल्या आहेत. त्यातील घडामोडी पाहता पक्ष आता राष्ट्रीय अध्यक्षपदावर ब्राह्मण चेहऱ्याला संधी देईल,' असं भाजप आणि संघाशी संबंधित सुत्रांनी सांगितली आहे.
संभाव्य ब्राह्मण चेहऱ्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे. ब्राह्मण नेत्याकडे अध्यक्षपद जावं अशी संघाची इच्छा आहे. त्यामुळे नड्डा अध्यक्ष पदावर कायम राहू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नड्डा यांचा उत्तम समन्वय आहे. भाजपच्या घटनेनुसार, कोणत्याही व्यक्तीला कमाल दोन टर्म अध्यक्षपदी राहता येऊ शकतं. तांत्रिकदृष्ट्या नड्डा यांचा एकच कार्यकाळ झाला आहे. आधी ते कार्यकारी अध्यक्ष राहिले. मग त्यांना जवळपास दीड वर्षांचा कार्यकाळ विस्तार मिळाला. नड्डा राजीनामा देतील आणि मग त्यांचीच औपचारिक निवड होईल, याची शक्यता अधिक असल्याचं सूत्र सांगतात.
भाजपच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या ब्राह्मण चेहऱ्यांमध्ये राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांच्याही नावाचा समावेश आहे. ते उत्तर प्रदेशचे आहेत. राज्यात त्यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. संघातून भाजपमध्ये सक्रिय झालेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. पक्ष संघटनेत त्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषवलं आहे. गुजरातमध्ये पक्षाचे प्रभारी महासचिव म्हणून काम केलं आहे. लखनऊचे महापौर राहिलेल्या दिनेश शर्मा यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.
भाजप आणि संघाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर फडणवीस यांचं नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं समीकरण बांधण्यासाठी आणि पक्षात पुढच्या पिढीचं नेतृत्व तयार करण्यासाठी फडणवीस यांना संधी दिली जाऊ शकते. फडणवीस यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपवलं गेल्यास पक्षाचे महासचिव आणि बिहारचे प्रभारी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते.
Post a Comment