मराठा आंदोलकांच्या वाहनावर नगर कल्याण रोडवर दगडफेक, युवक पोलिसांच्या ताब्यात

 


अहिल्यानगर - मराठा समाजाला इतर मागास वर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून शहागड-पैठणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले. काही आंदोलक जरांगे यांच्या ताफ्याच्या पुढे निघालेले असून या आंदोलकांच्या एका वाहनावर नगर - कल्याण रोड वर टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) गावाजवळ दगडफेक झाल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत त्या वाहनाच्या काचा फुटल्या व वाहनचालक जखमी झाला आहे. तर दगड फेकणाऱ्याला ही आंदोलकांनी बेदम मारहाण केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा रात्री उशिरा नगर जिल्ह्यात दाखल झाला तर तो पुढे कल्याण रोड मार्गे नगर जिल्हा हद्द ओलांडायला पहाट उजाडली. दरम्यान जरांगे पाटील यांच्या ताफ्याच्या पुढे दुपार पासूनच गावागावातील अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. अशाच काही आंदोलकांच्या गाड्या नगर कल्याण रोडने जात असताना रात्री ९ च्या सुमारास टाकळी ढोकेश्वर गावातील पारनेर चौकात आंदोलकांच्या एका गाडीचा रस्ता ओलांडणाऱ्या एका मोटारसायकलला कट बसला. त्यामुळे मोटारसायकल वरील आकाश अनिल थोरात (वय २६, रा. टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर) याने त्या वाहनचालकाला जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

काही वेळात प्रकरण शिवीगाळ करण्यावर गेले. त्यावेळी तेथे अजून काही आंदोलकांच्या गाड्या आल्या. या दोघांमध्ये सुरु असलेले भांडण हाणामारी पर्यंत गेले. त्यावेळी इतर आंदोलक त्या वाहनचालकाच्या मदतीला धावले व त्यांनी आकाश थोरात यास मारहाण केली. या रागातून आकाश याने रस्त्याच्या कडेला असलेले दगड घेवून वाहनचालकाच्या दिशेने फेकून मारले. त्यामुळे एका वाहनाच्या काचा फुटल्या. त्यात एक वाहन चालक जखमी झाला. त्यामुळे आकाश याला पुन्हा मारहाण करण्यात आली.

दगड फेकून मारणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

ही माहिती मिळताच त्या परिसरात बंदोबस्तासाठी असलेले पो.हे.कॉ.वैराळ, पो.कॉ.रविंद्र साठे, सतीश शिंदे यांनी तेथे धाव घेत आकाश यास ताब्यात घेतले. मारहाणीत तो जखमी झालेला असल्याने त्याला पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढे ग्रामीण रुग्णालयाने त्यास पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर केल्याने त्याला नगरला नेण्यात आले आहे. 

या प्रकरणी काचा फुटलेल्या वाहनचालकाने पोलिसांकडे फिर्याद न देता ते तसेच पुढे निघून गेल्याने सरकार तर्फे पो.कॉ. रविंद्र साठे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दगडफेक करणारा आकाश अनिल थोरात याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १२५ जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफवा न पसरविण्याचे आवाहन

मराठा आंदोलकाच्या वाहनावर दगड फेकून मारल्याची घटना घडलेली आहे. मात्र हा प्रकार मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून, वैयक्तिक वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे पारनेर पोलिसांनी सांगितले. कदाचित गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाला गालबोट लागल्याच्या अफवा कोणीही पसरवू नये असे आवाहन पारनेर पोलिसांनी केले आहे. 

0/Post a Comment/Comments