नगर तालुका (प्रतिनिधी) - शासनाच्या आदेशा नुसार गावच्या शिवारातील सरकारी जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना अतिक्रमण करून राहणाऱ्या व्यक्तीने सरपंच, उपसरपंच यांना शिवीगाळ करत ग्रामपंचायत सदस्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने खुनी हल्ला केल्यानंतर त्याच्या पत्नीने जखमी सदस्यासह उपसरपंचावर ७ ऑगस्टला अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या घोसपुरी (ता.नगर) ग्रामस्थांनी ८ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेत या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच हा खोटा गुन्हा असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नगर तालुक्यातील घोसपुरी येथे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चंद्रभान हंडोरे (वय ३७, रा. घोसपुरी, ता.नगर) यांच्यावर स्वामी सर्जेराव चव्हाण (रा. घोसपुरी, ता.नगर) याने लोखंडी रॉड आणि दगडाने खुनी हल्ला करत त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध ५ ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हापासून तो फरार आहे. जखमी हंडोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच आरोपी स्वामी चव्हाण याच्या पत्नीने ७ ऑगस्ट रोजी उपसरपंच संतोष खोबरे व जखमी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे या दोघांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केला आहे. हंडोरे यांना भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर ही आरोपीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर घोसपुरी गावात ग्रामस्थांमध्ये संतापाचे तसेच भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे गावात ८ ऑगस्ट रोजी सकाळी सरपंच किरण साळवे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील ज्येष्ठ नेते अशोक हंडोरे, पोपट झरेकर, विठ्ठल घोडके, निवृत्त कॅप्टन सुभाष ठोकळ, हरिभाऊ कवडे, कैलास इधाते, सोमनाथ झरेकर, संजय खोबरे, नाना गाढवे, श्यामभाई शेख, कैलास झरेकर, प्रा.इधाते, प्रभाकर घोडके, ग्रामसेविका श्रीमती ए.पी.गुंड यांच्या सह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खुनी हल्ल्याचा आणि खोटा अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केल्याचा निषेध नोंदवण्यात आला. या खोट्या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास करून सत्यता समोर आणावी, यानंतरही आरोपी व त्याच्या नातेवाईकांकडून ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी करूनच पुढील कारवाई करण्यात यावी, सदरचा हल्ला हा शासकीय काम करत असताना झालेला असल्याने दाखल गुन्ह्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचे वाढीव कलम लावण्यात यावे अशा मागण्यांचे ठराव करण्यात आले.
सरपंच किरण साळवे यांनी गावात पूर्वीपासून सर्व जातीधर्माचे लोकं एकत्र राहात असून सर्व सण उत्सव एकत्र साजरे करत आहेत. गावातील कोणीही बाहेरील संघटना व पदाधिकाऱ्यांच्या नादी लागून त्यांच्या सल्ल्यानुसार वागत गावातील सामाजिक सलोखा व शांतता बिघडवू नये असे आवाहन केले.
Post a Comment