ग्रामपंचायत सदस्यावर केला खुनी हल्ला; सरपंच, उपसरपंचालाही शिवीगाळ करत दमबाजी


नगर तालुका (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या आदेशा नुसार गावच्या शिवारातील सरकारी जमिनीवर मियावाकी फॉरेस्ट पद्धतीने वृक्ष लागवड करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना त्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या व्यक्तीने सरपंच, उपसरपंच यांना शिवीगाळ करत माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करत त्याचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी येथे घडली.

या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चंद्रभान हंडोरे (वय ३७, रा. घोसपुरी, ता.नगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आरोपी स्वामी सर्जेराव चव्हाण (रा. घोसपुरी, ता.नगर) याच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोसपुरी गावात सरपंच किरण साळवे, उपसरपंच संतोष खोबरे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर झरेकर हे २ ऑगस्ट रोजी दुपारी मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी गावच्या शिवारातील सरकारी जमिनीची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना त्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या स्वामी सर्जेराव चव्हाण या व्यक्तीने सरपंच व उपसरपंच यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी हंडोरे त्यास समजावून सांगत असताना त्याने अचानक हंडोरे यांच्यावर लोखंडी पाईप व दगडाने जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच ते खाली पडल्यावर आरोपी त्यांच्या छातीवर बसला आणि त्यांचा गळा दाबून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित इतरांनी हंडोरे यांना त्याच्या तावडीतून सोडवत त्यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी त्यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

गतवर्षी सरपंचावरही झाला होता कोयत्याने हल्ला

गतवर्षी २० जुलै २०२४ रोजीही गावातील एका अतिक्रमण धारकाने सरपंच किरण साळवे यांच्यावर कोयत्याने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गावातील रस्त्याचे मुरुमीकरण सुरु असताना माझ्या घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत अय्याज शौकत शेख याने हा हल्ला केला होता. या प्रकरणी त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट सह अॅट्रॉसीटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे

पुन्हा एका अतिक्रमण धारकाने ग्रामपंचायत सदस्यावर जीवघेणा हल्ला केल्याने ग्रामस्थ संतप्त झालेले असून सुमारे १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना ५ ऑगस्ट रोजीच निवेदन देवून आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तसेच सदर आरोपी हा खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत असल्याने त्याने गेले ३-४ दिवस ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांवर अॅट्रॉसीटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठीही प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले होते. या घटनेच्या निषेधार्थ ८ ऑगस्ट रोजी गावात विशेष ग्रामसभाही आयोजित करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments