अहिल्यानगर - ४ वर्षापूर्वी पारनेर मध्ये कार्यरत असताना प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यावेळी जळगावला बदली झाली होती. आता पुन्हा त्या नगर जिल्ह्यात बदलून आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत तहसीलदार पदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाच्या महसूल विभागाने ३० जुलै रोजी त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर मध्ये कार्यरत असताना आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता. या क्लिप मध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास, तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन केले होते. इतकेच नाही तर लोकप्रतिनिधी कडून होणारा त्रास देखील त्यांनी सांगितला होता. क्लिपनंतर ज्योती देवरे यांच्या विरोधातही तक्रारी करण्यात आल्या तर देवरे यांनी देखील तक्रारी केल्या.
या सर्वांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. यामध्ये ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर ज्योती देवरे यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला. या आदेशामध्ये ज्योती देवरे यांनी समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भाष्य केल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करण्यात आले होते. इतकेच नाही तर ज्योती देवरे यांनी तहसीलदार पदावर कार्यरत असताना शासकीय कामकाजात परायणता ठेवली नसून कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडलेल्या नाहीत असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. या कारणास्तव ज्योती देवरे यांची अखेर सप्टेंबर २०२१ मध्ये जळगाव येथे बदली करण्यात आली होती.
आता पुन्हा देवरे यांची नगर जिल्ह्यात बदली झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत तहसीलदार पदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
हे ही वाचा ...
रात्री झोपण्याआधी चावून खा किचनमधील हा हिरवा सुगंधी पदार्थ, होतील अनेक फायदे
Post a Comment