अहिल्यानगर - कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एमआयडीसीतील एका व्यावसायिकाची ८० लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. राजेश ब्रिजलाल बन्सल (वय ५५, रा. सावेडी, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात २८ जुलै रोजी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या विरोधात नगरमध्ये फसवणुकीचा हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल दर्शन जगताप, त्याची पत्नी एंजल ऊर्फ पायल सॅम्युयल ऊर्फ स्नेहल जगताप, आई सुशिला जगताप व ईब्राहीम सॅम्युयल (सर्व रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी राजेश बन्सल यांचे एमआयडीसी येथे अनुराज मोटर्स या नावाने व्हॉल्वो, आयशर या कंपनीचे ट्रक्स व बसेस खरेदी-विक्रीचे शोरूम आहे. ते व्हॉल्वो आयशर कंपनीचे जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते आहेत. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील छत्रपती मोटर्स प्रा.लि. अधिकृत डिलर अनुज अनिल मित्तल हे त्यांचे मित्र आहेत. मित्तल यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी सावेडी मधील एका हॉटेलमध्ये त्यांच्या ओळखीचे राहुल दर्शन जगताप (रा. सानपाडा, नवी मुंबई) याची ओळख करून दिली.
त्यावेळी राहुल जगताप व त्याचे बरोबर त्याची पत्नी एंजल राहुल जगताप ही देखील होती. त्यांनी रिजाईस इव्हेंट ऑर्गनायझेशन नावाची कंपनी असून ही कंपनी मेक माय ट्रीप या मोठ्या कपंनीची प्लॉटीनम होल्डर आहे, असे सांगितले. मेक माय ट्रीप या कंपनीची वेबसाईट दाखविली, त्यामध्ये त्यांच्या रिजाईस इव्हेंट ऑर्गनायझेशन या कंपनीचा प्लॉटीनम होल्डर असा उल्लेख होता. कंपनीबाबत इतर माहिती नमूद केलेली होती.
रिजाईस इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर ज्यादा परतावा देण्याचे आमिष या दोघांनी दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी २० ऑगस्ट २०२४ पासून ते ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत वेळोवेळी पैसे पाठविले. परंतु, ज्यादा परतावाही मिळाला नाही. गुंतवणूक केलेली रक्कमही मिळाली नाही. जगताप याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर आणि याबाबत अनुज मित्तल यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे समजल्यावर बन्सल यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार राहुल दर्शन जगताप, त्याची पत्नी एंजल, आई सुशिला जगताप व ईब्राहीम सॅम्युयल (सर्व रा. सानपाडा, नवी मुंबई) या चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींनी नगरमधील अनेक व्यावसायिकांना अशाप्रकारे फसविलेले असून त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १ तसेच तोफखाना पोलिस ठाण्यात व्यावसायिक तरुणीची ३० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एक आणि एका व्यावसायिकाची २४ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याचा एक असे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. आता आणखी एका व्यावसायिकाची ८० लाखांची फसवणूक झाल्याचा चौथा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच ३ गुन्हे दाखल झालेले असले तरी त्या गुन्ह्यांच्या तपासात काहीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे हे गुन्हेगार अद्यापही मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे. आता चौथा गुन्हा दाखल झाला असून आता तरी पोलिस या आरोपींच्या मुसक्या आवळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment