अहिल्यानगरच्या प्रख्यात महिला डॉक्टरचा अमेरिकेत बुडून मृत्यू, ढगफुटीसदृश पावसाचा बळी



अहिल्यानगर : राहुरी येथील दिवंगत डॉक्टर अनिरुद्ध वैद्य यांच्या पत्नी डॉ. अनुपमा वैद्य-चांदोरकर यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. 21 जुलै 2025 रोजी अमेरिकेतील कॅन्सस येथील ओव्हरलँड पार्क येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने तेथील नाल्याला पूर आला होता. त्यात बुडून वैद्य यांना प्राण गमवावे लागले. अहिल्यानगर आणि अमेरिकेतही डॉ. अनुपमा वैद्य यांचा मोठा परिवार आहे. राहुरी येथे असताना 2003 मध्ये राहुरी ते नगर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना वेळेवर मदत मिळाल्याने अनर्थ टळला होता. या प्रसंगाचीही त्यांच्या स्नेहीजणांनी आठवण सांगितली.

अमेरिकेत ईशान्य कॅन्ससमधील जॉन्सन कंट्री येथे आपल्या मुलीकडे वैद्य गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होत्या. सकाळी त्या पायी फिरायला जात असत. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी दक्षिण ओव्हरलँड पार्कच्या ट्रेलवरुन त्या चालत असताना अचानक ढगफुटीसारखा पाऊस झाला. यावेळी तेथील नाल्याला पूर आला. यामध्ये बुडून अनुराधा यांचा मृत्यू झाला. त्या फिरुन लवकर घरी न आल्यामुळे त्यांच्या मुलीने पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांनी शोध घेतल्यावर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती ओव्हरलँड पार्क पोलिस विभागाचे प्रवक्ते जॉन लेसी यांनी दिली.

ही बातमी समजल्यानंतर जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती यांनी 2003 मधील त्या प्रसंगाची आठवण सांगितली. त्यावेळी अनुराधा वैद्य राहुरीत राहत होत्या. त्या आपल्या वाहनाने नगरकडे येत असताना एमआयडीसीजवळ त्यांना अपघात झाला. त्यावेळी संचेती त्यांच्या सहकाऱ्यांसह सरकारी वाहनाने राहुरीकडे जात होते. अपघात पाहून ते थांबले. त्यांनी व चालकाने मदत करून वैद्य यांना त्यांच्या सरकारी वाहनातून नगरच्या रुग्णायात दाखल केले होते.

त्यानंतर त्यांना वैद्य यांच्याबद्दल माहिती मिळाली. पुढे संचेती आणि वैद्य यांच्या परिवाराचा स्नेह निर्माण झाला होता. आज जेव्हा वैद्य यांच्या मृत्यूची बातमी समजली, तेव्हा संचेती यांना त्या प्रसंगाची आठवण झाली.

कोण होत्या अनुपमा वैद्य?

अहिल्यानगरमधील प्रख्यात शिक्षक गणेश आणि सविता चांदोरकर यांच्या कन्या डॉ. अनुपमा वैद्य यांचा जन्म अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) शहरात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमधून घेतले. मुंबईतील सरकारी दंत महाविद्यालयातून दंतचिकित्सक पदवी प्राप्त केली.त्यानंतर त्यांचे सहकारी दंतवैद्य डॉ. अनिरुद्ध वैद्य यांच्याशी अनुराधांचे लग्न केले. त्या दोघांनी राहुरीच्या ग्रामीण भागात हजारो लोकांची सेवा केली. मुंबईतील एक फायदेशीर दंतवैद्यकीय कारकीर्द सोडून राहुरीत येत पती-पत्नी जोडीने त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीब आणि गरजूंच्या सेवेसाठी समर्पित केले.

काही वर्षांपासून त्या अमेरिकेत राहत होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, डॉ. अदिती आणि प्रीती, जावई, धनंजय आणि सौमित्र, नातवंडे, आयुष, मायरा आणि ध्रुव असा परिवार आहे. तसेच भारत आणि अमेरिकेतील कुटुंबातील सदस्य आणि मित्र असा मोठा परिवार आहे.

हे ही वाचा ...

मोठी बातमी! शाळेचे छत कोसळल्याने ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ८ विद्यार्थी जखमी

0/Post a Comment/Comments