श्रीगोंदा - सुट्टीसाठी गावी निघालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील लष्करी जवानाचा मृतदेह कोलकत्त्याजवळ खडकपूर परिसरात रेल्वे मार्गाशेजारी आढळून आला आहे. ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे या लष्करी जवानाचे नाव आहे. ते १५ जुलै रोजी रात्री नगरकडे येण्यासाठी निघाले होते.त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. थेट आठव्या दिवशी २२ जुलैला सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात आहे की, घातपात याचा शोध सैन्यदलाचे पथक व पश्चिम बंगाल पोलिस घेत आहेत.
लष्करी जवान ज्ञानदेव अंभोरे हे कोलकत्ता येथील लष्करी तळावर पायोनियर आर्मी युनिट १८०३ मध्ये हवालदार या पदावर नियुक्तीस होते. ते सन २००४ मध्ये सैन्य दलात भरती झालेले होते. त्यांनी जवळपास २१ वर्षे सैन्यदलात सेवा केलेली आहे व येत्या एक दोन वर्षात ते निवृत्त होणार होते. १५ जुलै रोजी ते काही दिवसांची सुट्टी घेवून गावी येण्यास निघाले होते. त्यावेळी रात्री ९.१५ ते ९.३० या दरम्यान त्यांनी पत्नीला कॉल करून आपण हावडा रेल्वे स्टेशन वर असून गावी येण्यासाठी निघालो असल्याचे सांगितले. त्या नंतर १६ जुलै रोजी त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईल वर संपर्क केला, मात्र त्यांनी दिवसभर फोन उचलला नाही. १७ जुलैला फोन बंद लागला.
अनेकदा फोन करूनही संपर्क न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोलकत्ता येथील त्यांच्या युनिटच्या कार्यालयात फोन करून माहिती दिली. सैन्य दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरु करत कुटुंबियांना कोलकत्त्याला बोलावून घेतले. त्यानंतर नगर हून त्यांचे बंधू व इतर नातेवाईक कोलकत्त्याला गेले. तेथे स्थानिक पोलिस, रेल्वे पोलिस आणि सैन्य दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबविली. या कालावधीत त्या परिसरात झालेल्या रेल्वे अपघातातील बेवारस मृतदेह कुटुंबियांना दाखविण्यात आले. त्यातील कोलकत्त्याच्या पुढे खडकपूर परिसरात १६ जुलै रोजी सकाळी आढळून आलेला मृतदेह ज्ञानदेव अंभोरे यांचाच असल्याचे २२ जुलै रोजी सायंकाळी निदर्शनास आले.
त्यानंतर तेथील सायबर पोलिसांनी अंभोरे यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते महाराष्ट्रात आढळून आले. तसेच पुणे रेल्वेस्थानकात हावडा ते पुणे आलेल्या आझाद हिंद एक्सप्रेस मध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. ती बॅग मयत जवान अंभोरे यांचीच असल्याचे समोर आले. मात्र त्यांच्या जवळ असलेली दुसरी बॅग ज्यात त्यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे होते. ती कोठेही आढळून आलेली नाही. मयत अंभोरे यांचा रेल्वेगाडीतून पडून अपघात झाला की, लुटीच्या उद्देशाने त्यांना कोणी रेल्वे गाडीतून खाली ढकलले याचा शोध सैन्यदलाचे पथक व पश्चिम बंगाल पोलिस घेत आहेत.
मयत जवान अंभोरे यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा, आई, सैन्यदलात असलेला भाऊ, भावजय, ३ बहिणी असा परिवार आहे. नगर तालुक्यातील शेतकरी सीताराम रामभाऊ कडूस यांचे ते जावई होत.
हे ही वाचा ...
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे केले अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकले, उपचार सुरू
Post a Comment