हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे केले अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकले, उपचार सुरू



धाराशिव - धाराशिव मधील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण व गंभीर मारहाणीची थरारक घटना बुधवारी सायंकाळी घडली. काही अज्ञातांनी सेल्फीच्या बहाण्याने त्यांना बोलावून गाडीत अडकवले आणि जवळपास पाच किलोमीटर अंतरावर नेत अमानुष मारहाण करून पुलावर फेकून दिले. सध्या नागेश मडके यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास नागेश मडके हे त्यांच्या हॉटेलसमोर उभे असताना, एका चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीकडे बोलावले. मडके गाडीकडे गेले असता अचानक त्यांनी त्यांना गाडीच्या खिडकीतून आत अडकवून गाडी वेगाने पळवली. यावेळी गाडीतच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

पुलावर नेऊन फेकले

अपहरणकर्त्यांनी मडके यांना "तुला मारून टाकायचं", "पुलावर फेकून देऊ", अशा धमक्या दिल्या. अखेरीस त्यांना धाराशिव जवळील वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिले गेले. मडके यांनी तत्काळ कुटुंबीयांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

10 जुलै रोजी आली होती धमकी

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेला अगोदर 10 जुलै रोजी मिळालेली जीवे मारण्याची धमकी पार्श्वभूमी ठरली आहे. त्या दिवशी एका अज्ञाताने फोनवर "सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं थांबवा, नाहीतर तुला संपवू," अशी धमकी दिली होती. त्या प्रकरणी धाराशिव पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments