नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर सोलापूर महामार्गावर शिरढोण (ता.नगर) गावच्या शिवारात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पुढे चाललेल्या बुलेटला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेट वरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला अन्य एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे.
या अपघातात कपिराज महादेव राजपुरे (वय ३५, रा. ठोंबळ सांगवी, ता.आष्टी, जि. बीड) हा मयत झाला आहे. तर अमोल पांडुरंग शेलार (वय ३१) हा जखमी झाला आहे. मयत व जखमी हे दोघे सकाळी बुलेट वर नगरच्या दिशेने येत होते. शिरढोण गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या बुलेटला धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. मयत कपिराज याच्या अंगावरून ते वाहन गेल्याने तो जागीच ठार झाला. तर जखमी अमोल शेलार याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्यातील पो.कॉ.रमेश शिंदे व चालक पो.कॉ. विकास शिंदे यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झालेला असून त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment