पंचनामा करण्यास गेलेल्या तलाठ्याला चावला साप: अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना


अहिल्यानगर - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतात गेलेल्या एका तलाठ्याला साप चावल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे. सदर तलाठ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा व लगतच्या भागात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, अधिकारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात वरील घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागातर्फे येथील नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

गवतात लपलेल्या सापावर पडला होता पाय

धनेगावचे तलाठी आकाश रामभाऊ काशिकेदार हे गुरुवारी सकाळीच गावच्या शिवारात जाऊन पंचनामे करत होते. ते सकाळीच 8 वा. घराबाहेर पडले होते. यावेळी शेतकरी सुहास काळे, संदीप काळे व प्रमोद काळे यांच्या शेताकडे नदीच्या काठावरून चालत जात असताना त्यांचा पाय गवतात लपलेल्या सापावर पडला. त्यानंतर काही कळण्याच्या आतच सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला. सर्पदंश होताच तलाठी काशिकेदार यांना भोवळ येऊ लागली. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तत्काळ लगतच्या वस्तीवर नेले. त्यांना धीर दिला. पण गाडी नदीतून पुढे जाऊ शकत नसल्यामुळे त्यांना उचलून बंधाऱ्यावरून पलिकडच्या काठावर नेले.

त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना जामखेड येथील शिलादीप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शेतकऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळेच त्यांना वेळेत उपचार मिळाले. या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी रुग्णालयात जाऊन काशिकेदार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments