कामरगाव खुनी हल्ल्यासाठी टिप आणि लोकेशन आरोपींना गावातील दोघांनीच दिल्याचे पोलिस तपासात समोर


नगर - नगर तालुक्यातील कामरगाव येथे २८ जुलै रोजी रात्री अन्सार रहीम शेख (वय ४०) याच्यावर कोयते, लोखंडी रॉड ने करण्यात आलेल्या खुनी हल्ल्यात आतापर्यंत १० आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यातील ६ जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तर या गुन्ह्यातील ४ आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अन्सार शेख वर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्याचे लोकेशन आणि तो काय करतोय याची टिप कामरगाव मधीलच रिहान नुरमोहम्मद शेख (वय १९) आणि त्याचा मित्र तेजस सुनिल ठोकळ (वय २३) या दोघांनी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

अन्सार शेख वर खुनी हल्ला झाल्यानंतर तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला सुपा येथील निरामय हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे २९ जुलै रोजी त्याने दिलेल्या जबाबावरून त्याचा मेव्हणा अजीज गुलाब सय्यद, अन्वर गुलाब सय्यद, सासरा गुलाब फकीरमहंमद सय्यद व त्यांचे अनोळखी ४ ते ५ अनोळखी साथीदार अशांवर नगर तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत. 

या गुन्ह्यात अजीज गुलाब सय्यद यास अटक केल्यानंतर त्याने पोलिस कोठडीत असताना ४ ऑगस्ट रोजी माहिती सांगितली की कामरगाव मधील माझ्या मामाचा मुलगा रिहान नुरमोहम्मद शेख (वय १९) आणि त्याचा मित्र तेजस सुनिल ठोकळ (वय २३) या दोघांनी अन्सार शेख कोठे बसलेला आहे, त्याच्या सोबत कोण आहेत, याची माहिती व त्या ठिकाणचे लोकेशन आम्हाला मोबाईलवर पाठविले होते. त्यानुसार आम्ही तेथे जावून अन्सार वर हल्ला केला असल्याची कबुली दिली. 

ही माहिती समोर आल्यावर पोलिसांनी रिहान नुरमोहम्मद शेख (वय १९) आणि त्याचा मित्र तेजस सुनिल ठोकळ (वय २३) या दोघांना १७ ऑगस्ट रोजी अटक केलेली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या शिवाय अमानत आदिल अन्सारी, अमीर अकिल अत्तार शेख, असिफ लतीफ शेख यांना ही पोलिसांनी अटक केली असून अन्वर गुलाब सय्यद, गुलाब फकीरमहंमद सय्यद,जुबेर सय्यद व पप्पु पाटोळे यांच्यासह अनोळखी २ ते ३ जण हे अद्यापही फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  

0/Post a Comment/Comments