अहिल्यानगर - राज्यातील ५८ जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्षांच्या निवडी भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी १३ मे रोजी दुपारी जाहीर केल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी श्रीरामपूर येथील नितीन दिनकर यांची निवड झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने भाजपानेही पक्ष संघटनेत मोठे संघटनात्मक फेर बदल केले आहेत. त्यात संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी १३ मे रोजी दुपारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात नगर शहर महानगर अध्यक्षांची निवड मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.
गेल्या ३५ वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या वाळकी (ता.नगर) येथील दिलीप भालसिंग यांच्यावर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपविण्यात आली आहे. भालसिंग हे सन १९९० पासून संघ आणि भाजपात कार्यरत आहेत. गावातील शाखाप्रमुख ते दक्षिण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. या प्रवासात त्यांनी ३ वेळा भाजपाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळले आहे. २०१६ मध्ये ते भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्यावर भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर ३ वर्षापूर्वी त्यांच्या वर भाजपाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. आता त्यांची फेरनिवड झाली आहे.
Post a Comment