मोठी बातमी ...नगर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात ‘या’ भागात झाली ढगफुटी, तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर जिल्ह्यात या वर्षी मे महिन्यात अवकाळी आणि मान्सून पूर्व पावसाने थैमान घातले आहे. शनिवारी (दि.२४) सकाळी ८ ते रविवारी (दि.२५) सकाळी ८ या २४ तासांत तर नगर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्याच्या अनेक भागात पावसाने कहरच केला आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असल्याने या तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने या भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद केली आहे.

नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. यावर्षी मे महिन्यातच १०० मिमी चा टप्पा ओलांडला गेला आहे. नगर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्याच्या अनेक भागात शनिवारी (दि.२४) सकाळी ८ ते रविवारी (दि.२५) सकाळी ८ या २४ तासांत तर कहर झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडे वारी नुसार नगर तालुक्यातील रुईछ्त्तीसी मंडळात ९२.३ मिमी, चिचोंडी पाटील मंडळात ६०.३ मिमी पाऊस २४ तासांत झाला आहे. याशिवाय नालेगाव मंडलात १५.३, सावेडी ३५ मिमी, कापूरवाडी १७.३ मिमी, केडगाव २८.३ मिमी, भिंगार ५१.८ मिमी, नागापूर २४ मिमी, जेऊर ३५.८ मिमी, वाळकी ४४ मिमी, चास ३०.३ मिमी, नेप्ती ३३.८ मिमी असा एकूण सरासरी ३९ मिमी पाऊस झाला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात ११ पैकी ९ मंडळांत अतिवृष्टी

गेल्या २४ तासांत श्रीगोंदा तालुक्यात पावसाचा रुद्रावतार पहावयास मिळाला. श्रीगोंदा तालुक्यात ११ पैकी ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामध्ये श्रीगोंदा ८७ मिमी, काष्टी ७२.३ मिमी, मांडवगण ९७.५ मिमी, बेलवंडी १३९ मिमी, पेडगाव ७८.५ मिमी, कोळगाव ११०.३ मिमी, लोणी व्यंकनाथ ९७ मिमी, भानगाव ७२.८ मिमी, आढळगाव ७२.८ मिमी, देवदैठण ३९.३ मिमी, चिंभळा २८.३ मिमी पाऊस झाला आहे. असा श्रीगोंदा तालुक्यात सरासरी ८१.३ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

कर्जत तालुक्यात कोंभळी मंडळात ८०.३ मिमी, भांबोरा मंडळात ७८ मिमी असा पाऊस झाल्याने तेथेही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या शिवाय खेड ६३.३, कोरेगाव ४९.८ मिमी, कुळधरण ५०.५ मिमी, मिरजगाव ५१.८ मिमी, कर्जत ५०.५ मिमी, राशीन ११.५ मिमी, माहीजळगाव ४३.५ मिमी असा कर्जत तालुक्यात सरासरी ५३ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

याशिवाय पारनेर तालुक्यात २५ मिमी, जामखेड तालुक्यात २३.४ मिमी, शेवगाव १२.५ मिमी, पाथर्डी ३४.८ मिमी, नेवासा 13.२ मिमी, राहुरी ११.१ मिमी, संगमनेर ४.१ मिमी असा पाऊस झाला आहे.  

0/Post a Comment/Comments