अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मण गल्ली मध्ये असलेल्या शंकर सावली मठ येथील बाबांच्या मूर्तीचे गळ्यातील व पादुका जवळील चांदीचे दागिने व रुद्राक्षाची माळ असा १३ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना १३ मे रोजी सकाळी १० ते रात्री १०.३० वाजल्याच्या दरम्यान घडली. चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या ८ तासांत माळीवाडा बस स्थानकावर पकडले आहे. रुपेश दादासाहेब खोजे (वय ३४, रा.कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मंदिराचे पुजारी कमलेश लक्ष्मण जंजाळे (वय २६, रा. ब्राह्मण गल्ली, माळीवाडा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांचे हॉटेल व्यवसाय सांभाळून शंकर सावली मठ येथे पुजारी म्हणून काम पाहतात. १३ मे रोजी सकाळी ७ वाजता फिर्यादी यांनी मठ उघडून पूजा केली. त्यावेळी मंदिरातील शंकर महाराज यांचे मूर्तीवरील दागिने सुव्यवस्थीत होते.
त्यानंतर फिर्यादी हे रात्री १०.३० वाजता निद्रा आरती करण्यासाठी मठामध्ये पुन्हा आले असता त्यांना बाबांच्या मूर्तीच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीची चांदीची चेन, २ हजार ५०० रुपये किमतीचा चांदीचा तुळजाभवानीचा टाक, बाबांच्या पादुका जवळील ६ हजार ५०० रुपये किमतीची रुद्राक्ष मण्याची चांदीची माळ असा १३ हजार रुपये किमतीचा ऐवज दिसून आला नाही.
त्यावेळी फिर्यादी यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात सकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान एक स्काय ब्ल्यू कलरचा फुल बायाचा शर्ट घातलेला व काळी फॉर्मल पॅन्ट घातलेला तसेच कपाळावर केसरी रंगाचा टिळा लावलेला अनोळखी इसम हा चोरी करीत असताना दिसून आला.
याबाबत कमलेश जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम ३०५ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला माळीवाडा बसस्थानवर पकडले
गुन्हा दाखल होताच पोनि. प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकास आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार पथक तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय माहिती काढत असताना त्यांना संशयित आरोपी माळीवाडा बसस्थानकावर चोरी करण्याच्या उद्देशान आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने माळीवाडा बसस्थानकात जावून संशयित रुपेश दादासाहेब खोजे (वय ३४, रा.कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) यास पकडले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली देत चोरलेले १३ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने काढून दिले.
ही कारवाई पोनि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या स.पो.नि. योगिता कोकाटे, महिला अंलदार रोहिणी दरंदले तसेच राजेंद्र औटी, संदीप पितळे, विशाल दळवी, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सूरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोनाथ केकाण, महेश पवार, सोनाथ राऊत, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली आहे.
Post a Comment