बडतर्फ पोलिस अधिकारी असलेल्या आरोपीने ‘सिव्हील’ मधून ठोकली धूम


अहिल्यानगर - जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केलेल्या एका आरोपीने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चकवा देत पलायन केल्याची घटना 10 जून रोजी सकाळी घडली. सुनिल उत्तम लोखंडे असे फरार झालेले आरोपीचे नाव असून तो पोलीस खात्यातून बडतर्फ केलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक आहे.

आरोपी सुनिल लोखंडे हा एका गुन्ह्यात सबजेलमध्ये कैदेत होता. त्याने लघवीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे त्याला ५ -६ दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी जिल्हा रुग्णालया मधून हा आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत.

आरोपी सुनिल लोखंडे हा पोलिस खात्यात पुणे येथे कार्यरत होता. त्याने राहुरी तालुक्यातील डीग्रस येथे बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून 'माझ्याशी संबंध ठेव', असे म्हणत मारहाण केली होती. या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 'माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला?' असे म्हणत या त्याने त्या महिलेच्या घरी गोळीबार करुन धुडगूस घातला होता.

त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने रिव्हलवर रोखले होते, त्यावेळी मिटके यांनी प्रसंगावधान राखल्याने गोळी चुकली आणि ते थोडक्यात बचावले होते. तेव्हापासून आरोपी हा नगर मधील सबजेलमध्ये होता. त्याला नुकतेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तो तेथून पळून गेला आहे. तोफखाना पोलीस रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीवरून त्याचा शोध घेत आहेत.

0/Post a Comment/Comments