गटविकास अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना नगरमध्ये रंगेहाथ पकडले

अहिल्यानगर -सेवा निवृत्त होण्यापूर्वी निलंबित झालेल्या ग्रामसेवकाचा दोषारोप पत्राचा अहवाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या राहुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७, रा. केशव कुंज रोड, श्रीराम चौक, ऐश्वर्या नगरी, अहिल्यानगर) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते शहरात आले होते. श्रीराम चौक येथे त्यांना लाच घेताना पकडण्यात आले.

सेवानिवृत्त ग्रामसेवकावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. निलंबन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी पाठवणार होते. हा अहवाल ग्रामसेवकाच्या बाजूने पाठविण्यासाठी मुंडे यांनी दहा हजारांची लाच मागितली. निवृत्त ग्रामसेवकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार श्रीराम चौक परिसरात सापळा रचून मुंडे याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सदरची कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे, पोलिस नाईक चंद्रकांत काळे, सचिन सुद्रुक, हरुण शेख यांच्या पथकाने केली. लाचखोर गटविकास अधिकारी मुंडे याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments